यावेळी राहुल आणि प्रियांकाविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, राहुल आणि प्रियांका या दोघांनाही मी वैयक्तिक ओळखत नाही. राहुल-प्रियांका हे चांगले की वाईट हे काँग्रेस ठरवेल. राहुल गांधींना अमेठीमध्ये पराभव दिसत आहे, त्यामुळेच ते दक्षिणेत पळाले, असे मोदी म्हणाले.
भाषणात राहुल यांचं नाव न घेण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्यांचं नाव घेत नाही याचं मीडियाला दुःख का होतंय. मी 'नामदार' नेत्याचं नाव कसं घेऊ. मी चहावाल्याचा घरातला माणूस आहे. ही लोकं मोठी आहेत, त्यांची नाव मी कशी घेऊ, असा टोमणा त्यांनी मारला.
काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोदींची टीका
जनतेने काँग्रेसची गेल्या 60 वर्षांची सत्ता पाहिली होती, त्यामुळे मी देशातील जनतेकडे 60 महिने मागितले होते. या 60 महिन्यातील आमच्या सरकारची कामगिरी समाधानकारक आहे. 60 महिन्यात देशातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देशाला गतीशील सरकार पाहायला मिळालं. मात्र या सगळ्याचं श्रेय जनतेला जातं, कारण त्यांच्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
या 60 महिन्याच्या कालावधीत आम्ही अनेक मोठे निर्णय घेतले गेले. पहिल्या सरकारबद्दल लोकांच्या मनात राग होता. मात्र आमच्या सरकारची काम करण्याची पद्धत पाहून जनतेच्या आशा आणखी वाढल्या आहेत.
देश स्वंतत्र झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि मी असे पंतप्रधान आहोत, की जे काँग्रेसच्या गोत्राचे नाहीत. इतर पंतप्रधान मग ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांचं गोत्र काँग्रेसचं होतं. त्यामुळे देशाने पहिल्यांदा काँग्रेसची विचारसरणी नसलेलं सरकार पाहिलं आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
EXCLUSIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वीची ऐतिहासिक मुलाखत | भाग 1 | एबीपी माझा
काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही मोदींनी टीका केली आहे. काँग्रेसने 60 वर्ष देशावर राज्य केलं. सरकार चालवण्याचा प्रदिर्घ अनुभव काँग्रेसकडे आहे. सरकारी व्यवस्थेची बलस्थानं आणि मर्यादा काँग्रेसला माहित आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून एका चांगल्या जाहीरनाम्याची अपेक्षा होती. काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा निराशजनक असून काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे. जी आश्वासनं याआधी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिली आहेत, ती पूर्ण केलेली नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
भारतीय सैनिकांचा अपमान करणं काँग्रेसला शोभत नाही
भारतीय सैन्यदलाबाबत जगभरातील देशांना आदर आहे. मात्र देशातील काही लोकांना सैन्याच्या पराक्रमावर संशय आहे. काँग्रेससारखा मोठा राजकीय पक्ष आपल्या सैन्याचा अपमान करतो हे अशोभनीय आहे. भारतीय सैन्याबाबत जगभरातून कधीही तक्रार आली नाही, त्यामुळे सैन्याबद्दल बोलताना विचार करणे गरजेचं असल्याचं मोदींनी म्हटलं.
काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. काश्मीरमधील परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. काश्मीरमधील प्रत्येक घरात आज वीज, शौचालय इत्यादी सुविधा पोहोचल्या आहेत. जम्मू काश्मीरची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. जम्मू-काश्मीरचा प्रवास योग्य दिशेने होत आहे. काश्मीरमधील क्रीडा, शैक्षणिक संस्थाही विकसित केल्या आहेत. कृषी क्षेत्रातही अनेक मोठे बदल झाले आहे. पहिल्यापेक्षा जम्मू-काश्मीरचा विकास वेगाने होते आहे, अशी माहिती मोदींनी दिली.
EXCLUSIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वीची ऐतिहासिक मुलाखत | भाग 2 | एबीपी माझा
देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका मांडली. देशविरोधी वक्तव्य आणि कारवाई करणाऱ्यांवर देशद्रोह अंतर्गतची कारवाई झालीच पाहिजे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. काँग्रेसने देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत 6 हजार जणांना कारागृहात पाठवलं. अशारीतीने काम करणारा पक्ष आज देशद्रोहाचं कलम हटवण्याची भाषा करत आहे, असं मोदींनी म्हटलं.
सरकारच्या हालचालींनंतर विजय मल्ल्या आणि नीरव मोदीवर कारवाई
देशाला हजारो कोटींचा चुना लावून पळालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावरील कारवाईबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली. आम्ही पावलं उचलली म्हणूनच देशातून पळालेल्यांवर परदेशात कारवाई झाली. सरकारच्या हालचालींमुळेच त्यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई झाली. मात्र आमचं सरकार आल्यानंतर त्यांनी देशाल लुटलं असं नाही, गेल्या दहा वर्षात त्यांनी हा पैसा जमवला. मात्र त्यांना माहित नव्हते आमचं सरकार येईल आणि त्यांना सगळा पैसा परत करावा लागेल. त्यामुळे त्यांना देशातून पळ काढावा लागला आहे.