धुळे: केंद्र सरकारने कायम महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले. महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरु केलेल्या योजनांची मविआने खिल्ली उडवली. मात्र, आज याच योजना प्रमुख आधार झाल्या आहेत. महायुती सरकारने 25 हजार महिला पोलिसांची भरती केली. यामुळे महिलांना सामर्थ्य मिळाले, त्यांना रोजगार मिळाला, त्या सशक्त झाल्या, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी धुळ्यातील सभेतून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.


या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महिला वर्गाला साद घालण्यासोबत महायुतीच्या काळात झालेला विकास आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा अधोरेखित करत एकप्रकारे विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला. त्यांनी म्हटले की, आमचं सरकार महिला सशक्तीकरणासाठी जी पावलं उचलत आहे, ती मविआला सहन होत नाहीत. लाडक्या बहीण योजनेची देशभरात चर्चा सुरु आहे. पण काँग्रेसी व्यवस्थेतील लोक ही योजना बंद करण्यासाठी कारस्थान रचत आहेत. महाविकास आघाडीला राज्यात सत्ता मिळाली तर काँग्रेस ही योजना बंद करेल. त्यासाठी महाराष्ट्रातील महिलांनी सतर्क राहिले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मविआला नाराशक्ती सशक्त होताना पाहवत नाही. काँग्रेस आणि मविआ आघाडीचे लोक महिलांना कशाप्रकारे शिव्या देतात, अभद्र बोलतात, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिला मविआला माफ करणार नाहीत, असे मोदींनी म्हटले.


काँग्रेसने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही: मोदी


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही राज्यातील जनतेची अनेक दशकांपासूनची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात राज्य केले, केंद्रात राज्य केले, अनेकदा काँग्रेसची दोन्हीकडे सत्ता होती. पण त्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची गरज कधी वाटली नाही. काँग्रेसने मराठी भाषेच्या सन्मानाकडे दुर्लक्ष केले. पण मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कसा दिला, याचं काँग्रेसवाल्यांना वैषम्य वाटते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.


महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला गती प्राप्त झाली: मोदी


महायुतीच्या काळात महाराष्ट्रात विकासाचे नवे विक्रम रचले गेले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राला गौरव आणि विकास पुन्हा प्राप्त  झाला. महायुतीच्या वचननाम्यातील 10 संकल्प हे प्रत्येक वर्गाच्या विकासाची हमी, समानतेची ग्वाही आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा विश्वास देणारा आहे. हा वचननामा विकसित भारताचा आधार आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी महिलांचं पुढे जाणं, त्या सशक्त होणे गरजेचे आहे. महिला पुढे जातात तेव्हा समाज पूर्ण वेगाने प्रगती करतो, असे मोदींनी म्हटले.


महायुतीच्या काळात महाराष्ट्रात प्रचंड परकीय गुंतवणूक झाली. दोन वर्षे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत अव्वल होता. गेल्या तीन महिन्यांत देशात आलेली एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे. केंद्र सरकार परकीय गुंतवणूक आणि विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देत आहे, असेही मोदींनी सांगितले. 



आणखी वाचा


अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी