पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांमधलं इनकमिंग-आऊटगोईंग सुरुच आहे. अशाच एका पक्षांतरामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.

विशेष म्हणजे निहाल यांच्या घरवापसीनंतर भाजपमध्ये असलेले आझम पानसरेही लवकरच स्वगृही परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसं झाल्यास राष्ट्रवादीमध्ये ते तिसऱ्यांदा प्रवेश करतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांची पानसरेंनी नुकतीच भेट घेतली होती.

निहाल यांना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला.

निहालचे वडील आझम पानसरे कोण आहेत?

आझम पानसरेंचे वडील फकीरभाई पानसरे यांचं नगरसेवकपदी असताना निधन झालं. याच जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून येत आझम पानसरे यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलं.

काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झाल्यावर ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. 1992 साली त्यांनी महापौरपद भूषवलं. तर त्यानंतर पक्षनेताही राहिले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताच पानसरे यांनी घड्याळ हाती धरलं.

पिंपरी चिंचवड शहराचे दोन वेळा ते शहराध्यक्षही राहिले आहेत. 1999 ची विधानसभा तर 2009 साली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी लढवली खरी, मात्र ते पराभूत झाले.

2014 साली पुन्हा ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. वर्षभर काँग्रेसमध्ये राहून ते पुन्हा स्वगृही परतले. विधानपरिषदेसाठी तीव्र इच्छुक असताना तिकीट नाकारल्याने ते नाक मुरडून होते. ही नाराजी दूर न झाल्यानं पानसरे यांनी जानेवारी 2017 मध्ये कमळ हाती घेतले.

भाजपमध्ये ज्या अपेक्षेने आले होते त्या पूर्ण न झाल्याने त्यांचा मुलगा निहालने घरवापसी केली आहे. आझम पानसरे यांच्या तब्येतीत सुधारणा होताच ते पुन्हा हातात घड्याळ घेणार आहेत.