मुंबई : डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका धवलसिंह यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रवादीला रामराम ठोकत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच दिवशी त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे माढा सहसंपर्क प्रमुख धवलसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे धवलसिंह राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

राष्ट्रवादीकडून माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटलांच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्याची माहिती आहे.

कोण आहेत धवलसिंह मोहिते पाटील?

धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार राज्यमंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र. अकलूज परिसरात मोठी ताकद असलेला युवा नेता म्हणून धवलसिंह यांची ओळख आहे. सदाशिवनगर भागातील शंकर सह साखर कारखान्याचं अध्यक्षपद त्यांनी दहा वर्ष भूषवलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी रणजितसिंह मोहितेंनी त्यांना पराभूत करुन कारखाना जिंकला होता.

रणजितसिंहांच्या भाजपप्रवेशानंतर धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर?

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये धवलसिंहांनी सदस्य म्हणून काम केलं असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. मोहिते-पाटील परिवार भाजपमय झाला असताना धवलसिंह आणि पवार यांच्या भेटीने राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं.

 VIDEO | रणजितसिंहांच्या भाजपप्रवेशानंतर सत्यप्रभादेवी मोहितेंची पहिली प्रतिक्रिया



मुंबईत काल (21 मार्च) बंद दाराआड तासभर झालेल्या चर्चेबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली.