पुणे : शिवक्रांती कामगार संघटनेने आज पिंपरी येथे एका कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ येणार होते. कार्यक्रम सुरु होण्याच्या ठरलेल्या वेळेत अजित पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांनी कामगारांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रम संपवून अजित पवार तिथून निघाले आणि त्याच वेळी पार्थ पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले. या घटनेमुळे पुन्हा एकदा पार्थ पवारांच्या उशिरा येण्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ पवारांचे कार्यक्रमांना, सभांना उशिरा पोहचण्याचे सत्र अद्यापही सुरुच आहे. ज्या कार्यक्रमांना पार्थ यांचे वडील आणि आजोबा वेळेवर पोहोचतात तिथे पार्थ पवार मात्र उशिरा दाखल होतात. गेल्या काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत. पिंपरीतल्या कार्यक्रमाला अजित पवार स्वतः वेळेत आले. वेळ न दवडता त्यांनी कामगारांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्थ पवार मात्र तब्बल दीड तास उशिरा पोहोचले. पार्थ तिथे दाखल होईपर्यंत त्यांच्या वडिलांचे भाषण संपले होते. मुलगा मंचावर आला तर वडिलांनी मंच सोडला. या कार्यक्रमानंतर अजित पवार पार्थ यांच्या प्रचारासाठी मावळला निघून गेले.

उशिरा पोहोचल्यामुळे आजच्या कार्यक्रमात पार्थ पवारांचे भाषण झालेच नाही. दुसऱ्या बाजूला पार्थ यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील अजित पवार कंबर कसून प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी पार्थ पवारांना त्यांच्या उशिरा आल्याबद्दल आणि भाषण न केल्याबद्दल विचारले असता मी बोलणं किंवा दादांनी बोलणं एकच आहे, दादांना जे बोलायचं होतं ते बोलुन गेले, मी कामगारांसाठी काय करणार याच्या सोशल मीडियावर मी पोस्ट टाकल्या आहेत, असं म्हणत पार्थ पवारांनी पुन्हा एकदा वेळ मारून नेहली.

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पार्थ पवार बैलगाडीत, समीर भुजबळ ट्रेनमध्ये | एबीपी माझा