IND vs ENG Semifinal : टी20 विश्वचषकातल्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. गयानातल्या या सामन्यात भारताला 2022 सालच्या टी20 विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल. 2022 सालच्या टी20 विश्वचषकातही भारत आणि इंग्लंड संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. अॅडलेडमधल्या त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला होता. रोहित शर्माच्या भारतीय संघानं त्या पराभवाची परतफेड करून यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारावी अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटरसिक करत आहेत. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पावसामुळे सामना रद्द होऊ शकतो, अथवा व्यत्यय येण्याचीही दाट शक्यता आहे. पण आयसीसीने उपांत्य सामन्यासाठी राखीव वेळ ठेवला आहे. 250 मिनिटांचा राखीव वेळ ठेवलाय, पण तो नियम नेमका आहे तरी काय ?
टी20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य सामना गयानामध्ये होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गयानामध्ये सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे. दोन दिवसांपासून गयानामध्ये संततधार सुरुच आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना सुरु होण्यास उशीर होऊ शकतो. आयसीसीने दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवला नाही. पण सामना संपवण्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवलाय. पण हा 250 मिनिटांचा नियम नेमका आहे तरी काय? भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावेळी याचा वापर कसा होणार?
250 मिनिटांचा नियम नेमका काय आहे?
टी20 विश्वचषकाचा थरार सुरु होण्याआधीच आयसीसीने उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस न ठेवता 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला होता. म्हणजेच, पाऊस अथवा इतर कोणत्या कारणामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला तर 250 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेचा वापर कऱण्यात येईल. म्हणजेच, भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात 250 मिनिटं म्हणजेच जवळपास 4 तास अतिरिक्त वेळ देण्यात आलाय. या भारतीय वेळानुसार रात्री 1.10 वाजेपर्यंत सामना खेळवण्याबाबत पंच निर्णय घेऊ शकतात. तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये षटकं कमी करण्यात येणार नाही. जर षटकांची संख्या कमी करण्याची वेळ आलीच तर उपांत्य सामना कमीत कमी 10 षटकांचा होऊ शकतो, असेही यामध्ये सांगण्यात आलेय.
उपांत्य सामन्यात पावसाची शक्यता -
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना गयानामध्ये होणार आहे. आज गयानामध्ये 90 टक्के पावसाची शक्यता आहे. सामना सुरु होण्याआधी दोन तास गयानामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय सामना सुरु झाल्यानंतरही पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे, नियोजित वेळेत सामना सुरु झाला तरी व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. आयसीसीकडून 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आलाय. म्हणजे सामना झाला तर क्रिकेट चाहत्यांना सात ते आठ तास वाट पाहावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, नियोजित वेळेत सामना सुरु होण्याची शक्यता खूपच कमी आहे.