बीड : खासदार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला होता. त्याबाबत दादासाहेब यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारदेखील केली. परंतु या तक्रारीनंतर पंकजा मुंडे समर्थकांनी दादासाहेब यांना मारहाण केली आहे.

काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा उमेदवारीवर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पंकजा मुंडे समर्थकांनी दादासाहेब मुंडे यांना मारहाण केली.

दादासाहेब मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून पूर्वी ओळखले जात होते. परंतु अतर्गत वादांमुळे दादासाहेब पक्षावर नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांचे कट्टर विरोधक म्हणून दादासाहेब यांची ओळख झाली आहे.

मारहाणीचा व्हिडीओ पाहा



...म्हणून घेतला उमेदवारीवर आक्षेप
प्रीतम मुंडे यांची मतदार नोंदणीमध्ये दोन ठिकाणी नावे आहेत. प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जात त्याची माहिती दिलेली नसल्याचा दादासाहेब यांचा दावा आहे. तसेच प्रीतम यांच्यावर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्याबाबतची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जात दिलेली नाही.

मालमत्तेवर सासरचं नाव, उमेदवारी अर्जावर माहेरचं नाव
प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या मालमत्तेवरील नावात स्वतःच्या नावासमोर पतीचे नाव लावले आहे. परंतु केवळ मतं मिळवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी स्वतःच्या नावासमोर वडीलांचे नाव लावले आहे, असा आरोप दादासाहेब मुंडे यांनी केला आहे.