बीड: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम हा निश्चितपणे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. लोकसभेच्या निकालांमुळे समोरच्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक संस्कृती आहे की, रडीचा डाव खेळू नये. जे पक्ष फुटले, त्यांची संख्या जास्त आली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे वक्तव्य बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Lok Sabha Result) भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. त्या बुधवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी उमद्या मनाने आपला पराभव स्वीकारला. मात्र, पंकजा मुंडे यांनी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.


प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर होत असतो. त्यामुळे जे पक्ष फुटले, तरीही लोकसभेत त्यांचे जास्त खासदार निवडून आले, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. समोरच्या बाजूला अत्यंत अनुभवी नेते आहेत. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेता आहे,  त्यांना चांगल्या जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेलाही जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून जास्त मेहनत केली पाहिजे. या निकालाचा परिणाम विधानसभेवर नक्कीच होणार आहे. प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर होत असतो, हे नाकारुन चालणार नाही. जातीयवादाचा माझ्या निवडणुकीवर परिणाम होत आहे, हे मी सतत सांगत होते. आगामी विधानसभा निवडणुकीवरही याचा परिणाम होईल. लोकसभेच्या विजयाने आता समोरच्या बाजूचा आत्मविश्वास दुणावला आहे. याच आत्मविश्वासने ते आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील. त्यांचे खासदार निवडून आले आहेत. याशिवाय, ज्या भागातून या खासदारांना लीड मिळाली, त्या भागातील आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीला चांगली परिस्थिती असेल. त्यादृष्टीने आमच्या पक्षाला स्ट्रॅटेजी आखावी लागेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. 


मी फेरमतमोजणीची मागणी केली होती. पण ती मान्य झाली नाही. यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. पण मला माझा पराभव मान्य आहे. पराभवदेखील हा प्रतिष्ठेने स्वीकारला पाहिजे, अशी शिकवण मुंडे साहेबांनी आम्हाला दिली आहे. उलट पराभव झाल्यानंतर  चेहरा अधिक प्रसन्न आणि हसरा ठेवून लोकांमध्ये जायला पाहिजे, असे त्यांनी आम्हाला शिकवले. कारण लोक आपल्यासाठी मर मर काम करतात. त्यामुळे लोकांना वाटता कामा नये की आपला नेता डळमळीत झाला आहे. लोकांनी मला अपेक्षित दिली त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. 


आणखी वाचा


जिल्हाधिकाऱ्यांनी 1500 पोस्टल मतदान मोजलंच नाही; पंकजा मुंडेंनी सांगितलं मतमोजणीवेळी रात्री काय घडलं