पंढरपूर : प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आपापल्या लाडक्या देवाला फोडून उमेदवार प्रचाराचा शुभारंभ करीत असतो . पंढरपूर तालुक्यात 1985 पासून निवडून येण्यासाठी बहुतांश उमेदवार रांजणी येथील महादेव मंदिरात येऊन शंभोला शरण जातात आणि येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करत आले आहेत. या निवडणुकीत प्रमुख असलेले राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान अवताडे, स्वाभिमानीचे सचिन पाटील आणि शिवसेना बंडखोर महिला उमेदवार शैला गोडसे या चारही प्रमुख उमेदवारांनी रांजणी येथे महादेवाला साकडे घालून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे .  


रांजणी हे पंढरपूर तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव आहे. शेकडो वर्षांपूर्वी असलेले शंभो महादेवाचे अतिशय जागृत  हेमाडपंथी मंदिर येथे आहे . पूर्वीच्या काळी रातंजन असे नाव असलेल्या या गावाला पुढे रांजणी असे नाव पडल्याचे मंदिराचे गुरव सांगतात. पूर्वीच्या काळातील हे दिंडीरवन असून भीमा नदीने येथे प्रवेश केला असे गुरव सांगतात. महादेव आणि पार्वती यांनी येथे एक दिवस मुक्काम केल्याचे काशीखंड ग्रंथात असल्याचे ते सांगतात. या मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वयंभू मूर्तीतील पिंडी आणि मधले शिव लिंग वेगळे होते आणि या स्वयंभू  पिडींत गारगोट्या असल्याचे गुरव सांगतात. शेकडो वर्षांपासून या  जागृत शिवमंदिरावर  भाविकांची श्रद्धा असल्याने आणि याची प्रचिती आता राजकीय पक्ष व नेते याना मिळू लागल्याने निवडणूक प्रचाराचा शुभारंभ येथील महादेवाला साकडे घालून करण्यात येऊ लागला आहे.


याची सुरुवात  पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी पहिल्यांदा 1985 साली रांजणी येथील महादेवाची पूजा करून प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्यांना घवघवीत यश मिळाले . यानंतर सलग पाच निवडणूक परिचारक याना याच रांजणीच्या महादेवाने हात दिल्याने परिचारक 25 वर्षे आमदार झाले . यानंतर 2009 साली पंढरपूर मधून मोहिते पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आणि त्यांच्या विरोधात भारत भालके यांनी रांजणी येथूनच प्रचाराचा नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला होता . या निवडणुकीत भालके याना शंभो महादेव पावला आणि त्यांनी  अतिशय अनपेक्षित असा विजय मिळविला . यानंतर झालेल्या 2014 व 2019 या निवडणुकीतही भारत भालके यांनी रांजणी येथूनच प्रचाराचा शुभारंभ करीत विजयी झाले होते . 


यामुळे सर्वच प्रमुख उमेदवार यंदा रंजनाच्या महादेवाला शरण आले असून याची पहिली सुरुवात शिवसेनेच्या बंडखोर महिला उमेदवार शैला गोडसे यांनी केला . यानंतर स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी आपला उमेदवार सचिन पाटील याच्या प्रचाराचा नारळ फोडला . तर त्याच दिवशी दुपारी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी उमेदवार भगीरथ भालके याच्या प्रचाराचा नारळ फोडला . आज भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनी रांजणी येथे येत महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला . या निवडणुकीत असलेल्या सर्व प्रमुख चार उमेदवारांनी रांजणी येथील एकाच शंभोला साकडे घातल्याने आता महादेव कोणाला पावणार हे कळायला 2 मे पर्यंत वाट पाहावी लागणार असली तरी या प्रचार शुभारंभाच्या काळात झालेल्या गर्दीमुळे शंभो महादेवांनी रांजणी ग्रामस्थांना कोरोनाच्या संकटापासून दूर ठेवावे अशीच प्रार्थना गावकरी करीत आहेत . 


संबंधित बातम्या :