पंढरपूर : कोरोनाच्या लाटेत झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार असून या अटीतटीच्या लढतीत निसटत्या मताने राष्ट्रवादीचे भगीरथ भालके विजयी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात ही लढत होत असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात तब्बल 5 दिवस तळ ठोकून संपूर्ण निवडणुकीची गोळाबेरीज केली होती. त्यामुळे ही निवडणूक भगीरथ भालके यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची बनली होती . 


प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत ही निवडणूक राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्याकडे एकतर्फी झुकल्याचे चित्र होते मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एक दिवसाच्या दौऱ्यामुळे पुन्हा भाजप आघाडी घेतली होती. 2 मे रोजी या ठिकाणाची मतमोजणी होत असून कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे केवळ 14 टेबलावर ही मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास बराच उशीर होणार आहे.


राष्ट्रवादी उमेदवार भगीरथ भालके यांच्या जमेच्या बाजू 


वडील भारत भालके यांच्या अचानक मृत्यूमुळे असलेली सहानुभूतीची लाट ही भगीरथ यांची सर्वात मोठी जमेची बाजू असून वडिलांची गोरगरीब मतदारांत असलेली लोकप्रियतेच्या जोरावर भगीरथ यांच्यासाठी हि निवडणूक जिंकणे जास्त सोपे झाले आहे . याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावलेल्या ताकतीचा खूप मोठा फायदा भगीरथ याना मिळणार आहे. विशेषतः अजित पवार यांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात अनेक विरोधात असलेल्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांना भगीरथ यांच्या प्रचारात सक्रिय केल्याने याचा फायदा निकालात दिसून येणार आहे. तसे पहिले तर ही निवडणूक जिंकणे भगीरथ भालके यांच्यापेक्षा अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे बनले आहे . 


भगीरथ भालके यांच्या कमकुवत बाजू 


मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाणीप्रश्नाबाबत वडील भारत भालके यांनी 3 निवडणूक जिंकूनही हा प्रश्न सुटला नव्हता. आता पुन्हा तोच प्रश्न फडणवीस यांनी कळीचा बनवल्याने याचा फटका बसू शकेल . मंगळवेढ्याचा स्थानिक उमेदवार व भूमिपुत्र म्हणून समाधान अवताडे यांना गेल्यावेळीपेक्षा जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीचे सचिन पाटील आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे यांच्या मताचा फटका बसण्याची भीती. सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटच्या दोन दिवसात दिसलेला नियोजनाचा अभाव यामुळे भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढू शकतात. अशा परिस्थितीतही भगीरथ भालके विजयी झाले तर त्याचे सर्व श्रेय भारत भालके यांची पुण्याई आणि अजित पवार यांचे अपार कष्ट यालाच मिळणार आहे. 


भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या जमेच्या बाजू
 
एक उद्योजक म्हणून राजकारणात आलेल्या अवताडे यांच्याकडे आर्थिक बाजू भक्कम आहे. त्यांच्या जोडीला भाजपने विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांची जोडून दिलेली साथ त्यांना पंढरपूर आणि मंगळवेढा भागात खूप फायदेशीर ठरणारी आहे. परिचारिकांच्या पांडुरंग परिवाराने संपूर्ण ताकतीने केलेला प्रचार आणि मतदान यामुळे अवताडे याना यंदा पंढरपुरात चांगली मते मिळणार असून मंगळवेढा भागातही परिचारक समर्थकांची मते मिळाल्याने विजयाची अशा पल्लवित झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 6 जंगी सभा हा त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला असून प्रचारास शेवटच्या दोन दिवसात अतिशय नियोजनबद्ध रीतीने झालेले काम त्यांना उपयोगी ठरणार आहे . 


भाजप समाधान अवताडे यांच्या कमकुवत बाजू 
 
समाधान अवताडे यांचे वक्तृत्व ही त्यांची सर्वात मोठी कमकुवत बाजू असून गेल्या दोन निवडणुकांनंतर जनसंपर्काचा अभाव हा त्यांना मारक ठरणार आहे. त्यांच्याच घरातील चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांची बंडखोरीची त्यांना त्रासदायक ठरणारी असून जितकी जास्त मते सिद्धेश्वर याला मिळतील तितका समाधान अवताडे यांचा विजय दूर जाणार आहे. ऐन निवडणुकीच्या प्रचारात आलेला दामाजी साखर कारखाना सभासद रद्दचा निर्णय त्यांना अंगलट येताना दिसत असून त्यांनी केलेला खुलासा कितपत जनतेपर्यंत पोचला हेही सांगणे कठीण आहे. अशात जर समाधान अवताडे विजयी झाले तर मंगळवेढ्यात झालेला भूमीपुत्राचा सकारात्मक प्रचार, परिचारिकांची साथ आणि फडणवीस , पडळकर जोडीचा प्रचार ही त्यांच्या विजयाची कारणे ठरू शकतील .