पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान, सोमवारी मतमोजणी
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 23 Mar 2019 05:52 PM (IST)
पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगणार आहे. मतदान उद्या होणार असून रविवारी निकाल जाहीर होईल
पालघर : पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच रविवारी 24 मार्चला मतदान होणार असून 25 तारखेला निकाल हाती येणार आहे. 14 प्रभागांमध्ये 28 जागांसाठी मतदान होणार असून 90 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत. 90 पैकी 30 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी नऊ झोन तयार केले असून 62 मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी तर केंद्राध्यक्षासह पाच कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया EVM मशिनद्वारे पार पडणार असून व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार नाही. या निवडणुकीत 47 हजार 850 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगणार आहे. नगर परिषद प्रचार काळात शिवसेना भाजपचे दिग्गज पालघरमध्ये तळ ठोकून होते. आतापर्यंत पालघर नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता होती, मात्र आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आयात उमेदवाराला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेना-भाजप-रिपाइंसाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाली आहे. कारण निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली. मात्र पालघरमधील मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतो, हे येत्या 25 मार्चला आपल्याला पाहायला मिळेल.