हुकूमशाहीच्या मार्गावरील रशिया...
एबीपी माझा वेब टीम | 23 Mar 2019 03:21 PM (IST)
जगभरातील कोणत्याही देशात सरकार कुणाचेही येवो पण तिथं विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे आणि त्याचे स्वरूपही मजबूत असले पाहिजे, सध्याची रशियाची परिस्थिती पाहून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विरोधकच नको किंवा विरोधच नको ही प्रवृत्ती अंती सार्वजनिक स्वास्थ्याचाच गळा घोटते. सत्तेत असणारी सरकारे, यंत्रणा, विचारधारा यांचे विरोधक संपवले गेले तर भविष्यात त्या त्या देशातील जनतेलाच त्याचे परिणाम भोगावे लागतात असं आजवरचा जगभरातला इतिहास सांगतो.
SIMFEROPOL, CRIMEA - MARCH 18: (RUSSIA OUT) Russian President Vladimir Putin (C) attends a concert March 18, 2019 in Simferopol, Crimea, Russia. Putin is having a one-day visit to Crimea, a disputed territory, marking the 5th anniversary of its annexation. (Photo by Mikhail Svetlov/Getty Images)
व्लादिमीर पुतीन यांच्या रशियातल्या राजवटीने नवे स्वरूप घेतले आहे याची एक झलक. पुतीन यांनी सत्तेत आल्यापासून सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर ताबा मिळवला आहे. सरकारविरोधात बातम्या देणे तिथे पूर्णतः बंद झाले आहे, रशियन वृत्तपत्रांत थोडीशी धुकधुकी बाकी आहे. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या, टीका करणाऱ्या, बातम्या देणाऱ्या, प्रचार करणाऱ्या लोकांमागे क्रिमिनल चौकशीचे लचांड लावून त्यांचे जगणे असह्य केले जाते. बेपत्ता झालेल्या आंदोलकांची, टीकाकारांची आणि मानवी हक्क चळवळीच्या कार्यकत्यांची संख्या मोठी आहे. अवघे 17 वर्षे वय असलेल्या मिखाईल झ्लोबित्स्की या तरुणाने एखरांगेस्क या रशियन शहरातील एफएसबीच्या (FSB - Russian : Federalnaya Sluzhba Bezopasnosti, इंग्रजी : फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस) कार्यालयापुढे स्वतःला उडवून दिले. मिखाईलने पुतीन सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात आवाज उठवला होता, तो ज्युनियर कॉलेज स्टुडंट होता. त्याने पुतीन सरकारवर टीका केल्यापासून त्याला गुन्हेगार ठरवण्यासाठी तिथल्या यंत्रणांनी जंग जंग पछाडले. त्यातून त्याचे मनस्वास्थ्य बिघडले. या सरकारविरोधात आपण काही विचार मांडण्यात वा विरोध करण्यात आपण कमी पडलो तर आपल्या जगण्यात अर्थ नाही असं त्याला वाटू लागलं. त्यातुन त्याने टोकाचे पाऊल उचलले. या आत्मघातकी हल्ल्यात तो जागीच मरण पावला आणि अन्य तीन लोक गंभीर जखमी झाले. ही घटना ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीची आहे. त्याने ज्या FSB च्या कार्यालयापुढे स्वतःला संपवले ती FSB म्हणजे पूर्वाश्रमीची KGB ही बदनाम रशियन गुप्तचर संस्था होय. KGB ने जगभरात केलं त्याहून क्रूर आणि कपटी काम आपल्याच देशात FSB करते आहे. इथे उल्लेखनीय बाब म्हणजे मिखाईल झ्लोबित्स्कीचं वय. पुतीन यांच्या सत्तेत तो जन्मला वाढला. म्हणजे पुतीन यांच्या आधीच्या रशियन राजनीतीचा त्याच्यावर तुलनेने कमी परिणाम पडलेला असणार हे नक्की. पुतीन यांच्या राजवटीच्या काळात जडण घडण होऊनही मिखाईल झ्लोबित्स्कीचा भ्रमनिरास झाला. पुतीन यांच्या कडव्या उजव्या राष्ट्रप्रेमी विचाराने भारलेल्या युवावर्गाची संख्या मोठी होती. पुतीन सत्तेत येण्याआधी त्यांचा जो 'जोश' होता तो आता ओसरलाय, ते प्रौढत्वात आले आहेत. सोबत त्यांचा 'होश'ही परत आलाय. पण त्याचा फारसा उपयोग नाही कारण हा 'होश' प्रकट करण्याची परवानगी तिथं नाही. पुतीन यांना सत्तेत आणणाऱ्यांना त्यांचे सत्य उमजलेय पण ते हतबद्ध आहेत. तर आता मिखाईल झ्लोबित्स्कीसारख्या ज्या तरुणांचे रक्त सळसळतेय ते आपल्या परीने आवाज उठवण्याचा प्रयत्न करताहेत पण अक्राळ विक्राळ रशियन गुप्तचर संस्था व पोलीसदले यांच्या कराल जबड्यातून त्यांची सुटका शक्य नाही, त्यांचा आवाजही पोलादी पडद्याबाहेर उमटत नाही. तरीदेखील पुतीन यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि सरकारी यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या नवतरुणांची संख्या मोठी आहे. मिखाईल झ्लोबित्स्कीचे बलिदान नव्या पिढीला प्रेरित करुन गेलेय. स्वेतलाना प्रोकोपेवा या तरुणीने या घटनेनंतर खासगी रेडीओ सेंटरद्वारे मिखाईलची पाठराखण केली होती. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर तिने प्रश्नचिन्हे लावत पुतीन यांच्या काळात माध्यमांनी स्वीकारलेल्या गुलामगिरीवर तिखट आसूड ओढले. FSB ने तिच्या घरावर धाड टाकली. पण पलायन करण्यात ती यशस्वी झाली. ब्रिटनमध्ये जाऊन FSB च्या लोकांनी सेर्गी आणि युलिया स्क्रिपल या माजी रशियन डबल एजंटची व त्याच्या मुलीची हत्या करण्याचा भयानक कट कसा अमलात आणला होता हे लोकांच्या स्मरणात असेलच. युवा वर्गात पुतीन यांच्याविरुद्ध सुरु असलेली अस्वस्थता हुकूमशाही आणि एकाधिकारशाही विचारांचे भोक्ते असलेल्या पुतीन यांच्या पचनी पडलेली नाही. दोनच दिवसापूर्वी त्यांनी एका नव्या अधिनियमावर स्वाक्षरी केली आहे. हा कायदा जगभरातील अशा विचारसरणीच्या राजवटींना भुरळ पाडणारा आहे. मिखाईल आणि स्वेतलाना ही नव्या रशियन पिढीची नवी विचारमुल्ये होत म्हणूनच इथे त्यांचे उदाहरण दिलेय. कायद्यानुसार रशियन समाजाबद्दल अनादर करणाऱ्या, रशियन सरकार, रशियन कार्यालयीन प्रणाली / सन्मानचिन्हे, रशियन संविधान, रशियन राज्ये, राज्यसरकारे तसेच कोणत्याही व्यक्ती / संघटना, संस्था यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्ये करणाऱ्या तसेच सरकारविरोधातील बातम्यांना फेक न्यूज समजले जाऊन त्यांच्याविरोधात दहशतवादी कायद्याअन्वये कारवाई केली जाईल, अशी तरतूद त्यात आहे. पुतीन यांचा हा कायदा अंमलात आला तर रशियन सरकार व यंत्रणा यांच्याविरोधातील आवाज पूर्णतः दडपला जाईल, त्याला अणूरेणूइतकीही जागा उरणार नाही. एकेक करून विरोधी पक्षनेते संपवून नंतर विरोधी पक्ष नेस्तनाबूत करून त्याही पुढे जात आपल्याच पक्षातील विरोधकांचा सफाया पुतीन यांनी केला आहे. आता जनतेमधील विरोधक संपवण्याचं त्यांच्या मनात घाटतंय. ज्या रशियन जनतेने पुतीन यांच्या हाती सत्ता देताना विरोधक संपवले होते, त्यांना आता वाटतेय की किमान विरोधाचा एल्गार बुलंद करण्यासाठी तरी विरोधक हवे होते. पण बहुधा आता उशीर झालाय. याची जाणीव त्यांनाही आहे. कदाचित लेनिनच्या काळात जो पोलादी पडदा रशियाने अनुभवला होता त्याच्यापेक्षाही कराल वज्रमुठीच्या पकडीत आता रशियन जनता अडकून पडेल. तिथली माध्यमे तर केंव्हाच मृत पावली आहेत. आता वेळ जनतेच्या सनदशीर, न्याय्य, संवेदनशील विरोधाच्या हक्काच्या गळचेपीची आहे. जगभरातील कोणत्याही देशात सरकार कुणाचेही येवो पण तिथं विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे आणि त्याचे स्वरूपही मजबूत असले पाहिजे हेच यातून अधोरेखित होते. विरोधकच नको किंवा विरोधच नको ही प्रवृत्ती अंती सार्वजनिक स्वास्थ्याचाच गळा घोटते. सत्तेत असणारी सरकारे, यंत्रणा, विचारधारा यांचे विरोधक संपवले गेले तर भविष्यात त्या त्या देशातील जनतेलाच त्याचे परिणाम भोगावे लागतात असं आजवरचा जगभरातला इतिहास सांगतो. आपल्याकडील हुकूमशाही वृत्तीच्या पाठीराख्यांनी यावर चिंतन अवश्य करावे. सावध ऐका पुढल्या हाका ! येणारा काळ आहे बाका !!