मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या पाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राज म्हणाले की, आमच्या देशाच्या पंतप्रधानांची जगभरात 'फेकू' अशीच ओळख आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. तुम्हाला जर त्याची खात्री करुन घ्यायची असेल तर, इंटरनेटवर 'फेकू' असा शब्द टाईप करा आणि पाहा कोणाचं नाव दिसतं? कोणाचा फोटो येतो? तुमच्या लक्षात येईल इंटरनेटवर मोदींची 'फेकू' अशीच ओळख आहे.

राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान होण्याची महत्त्वकांक्षा असलेल्या कित्येक नेत्यांची उभी हयात निघून जाते. पंतप्रधानपद त्यांना मिळत नाही. त्यापैकीच एक म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी. त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं, परंतु ते होऊ शकले नाहीत. पतंप्रधान होण्याची संधी मोदींना मिळाली. परंतु पतंप्रधान झाल्यानंतर त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी देशाला खड्ड्यात नेलं आहे.

राज म्हणाले की, राहुल गांधी सांगतात ते खरं आहे. मोदींनी खूप काही शिकवलं आहे. मोदी वर्षातून एकदाच स्वतःच्या आईला भेटायला जातात, त्यावेळी मीडियाला सोबत घेऊन जायची काय गरज असते? नोटबंदी झाल्यानंतर मोदींनी स्वतःच्या आईला बँकेबाहेरच्या रांगेत उभं करुन भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पंतप्रधान होईपर्यंत मोदींना आई आहे, हे आम्हाला माहितही नव्हते.

वाचा : सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांवर खटले दाखल करुन मोदींनी मतांचं राजकारण केलं : राज ठाकरे