मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी काल (बुधवारी 4 डिसेंबर) महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केला. आज गुरुवारी (5 डिसेंबर) भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. अशा प्रकारे महायुती आज 230 जागांसह सरकार स्थापन करणार आहे. मात्र, महायुतीतील क्रमांक दोनच्या पक्षाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. दरम्यान आज होणाऱ्या शपथविधीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर शपथविधीच्या स्टेजवर 'आता महाराष्ट्र थांबणार नाही' असे बॅनर लागले आहेत. त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यभरात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शुभेच्छा देणार बॅनर लागले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाने देखील ईव्हीएम संदर्भात बॅनरबाजी केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी
मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानाच्या समोरच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूला तिन्ही पक्षाचे झेंडे लावण्यात आलेले आहे. हीच उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये देखील पाहायला मिळते आहे. भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स या मैदानाच्या बाहेर लावलेले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी देखील रस्त्याच्या दुतर्फा बॅनर्स लावण्यात आलेत.
ठाकरे गटाकडून ईव्हीएम संदर्भात बॅनरबाजी
एकीकडे आज मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेणार असून जागोजागी "देवाभाऊ" च्या अभिनंदनचे पोस्टर लागलेले असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून ईव्हीएम संदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे. "देवा शपथ" सांगा "ईव्हीएम" च गौडबंगाल काय? असं म्हणत काही प्रश्न या वेगवेगळ्या पोस्टर्स वर विचारण्यात आले आहेत. भारतात निवडणुका घेताना ईव्हीएमचा हट्ट का केला जातोय? असा सुद्धा प्रश्न या सगळ्या पोस्टर्स मध्ये विचारण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी वांद्रे व मुंबई विविध ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर्स लावले आहेत.
शपथविधीसाठी नाशिकहून साधू महंत मुंबईच्या दिशेने रवाना
राज्य सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी नाशिकहून साधू महंत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री आज आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंतांना निमंत्रित करण्यात आला आहे. त्यामुळे जय श्रीराम चा घोषणा देत नाशिकहून साधू महंत आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.