जळगाव :  अमळनेर येथे माजी आमदार बी. एस. पाटील मारहाणप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सहा जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल माजी आमदार बी. एस. पाटील यांना वाघ यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या जाहीर मेळाव्यात मारहाण केली होती.


VIDEO | कोणत्या विधानामुळे झाला जळगाव भाजप मेळाव्यात राडा? | एबीपी माझा


दरम्यान, मला मारहाण झालेली नसून मी मध्यस्थी करण्यासाठी गेलो होतो. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार पाटील यांना मारहाण करणे निषेधार्ह असून कार्यवाही करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

काल, जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते.

अमळनेरमध्ये काल संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुरुवातीला उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. मंचावरच दोन्ही नेते भिडले. यावेळी चपला बुटांनी एकमेकांना मारलं.
VIDEO | माजी आमदार बी.एस.पाटील यांना भाजप मेळाव्यात मारहाण | जळगाव | एबीपी माझा


गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बी एस पाटील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. उदय वाघ यांच्या समर्थकांनी यावेळी स्मिता वाघ आगे बढो, अशी घोषणाबाजीही केली.

उदय वाघ हे आमदार स्मिता वाघ यांचे पती आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करुन उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यामागे बी एस पाटील यांचा हात असल्याचा संशय उदय वाघ यांच्या मनात होता. त्याच रागातून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे.

आज स्मिता वाघ आणि उदय वाघ यांच्या गावात भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्याचीच संधी साधून उदय वाघ आणि समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली. यावेळी स्वत: गिरीश महाजन यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.