मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.


नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 116 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट सामना होणार आहे, तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना भिडणार आहेत.

नागपूरची रंगतदार लढत - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील राजकारणात सर्वाधिक चर्चा होणाऱ्या मतदारसंघात गणला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि थेट पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करुन स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतलेले नाना पटोले यांच्या लढतीकडे देश लक्ष ठेवून असणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड मानला जात असला, तरी नागपूरच्या इतिहासात काँग्रेसचा खासदार सर्वाधिक वेळा विराजमान झाला आहे. 1996 साली भाजपने पहिल्यांदा नागपूरची जागा जिंकली होती. त्यानंतर 1998 पासून चार वेळा काँग्रेस नेते विलास मुत्तेमवारांनी हा गड आपल्याकडे ठेवला. 2014 मध्ये नितीन गडकरी मैदानात उतरले आणि त्यांनी जवळपास अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवत नागपूर भाजपकडे खेचून आणला.

वर्ध्याची स्पर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस) VS अॅड. धनंजय वंजारी (वंचित बहुजन आघाडी)

महात्मा गांधी यांच्या वास्तव्याचा वारसा असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ एके काळी काँग्रेसचा गड होता. राष्ट्रीय राजकारणात नेतृत्व करणारे चेहरे या मतदारसंघाने दिले. काँग्रेसच्या गडाला पहिलं खिंडार पाडलं ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते रामचंद्र चंगारे यांनी. त्यानंतर काँग्रेसला हा गड अभेद्य राखण्यात सातत्य दाखवता आलं नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस रामदास तडस यांनी दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने काँग्रेसच्या सागर मेघेंचा पराभव केला होता. दरम्यानच्या काळात सागर मेघे भाजपवासी झाले. काँग्रेसकडून माजी राज्यपाल प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांच्याही सभा या मतदारसंघात झाल्यामुळे या मतदारसंघाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा, धामणगाव, मोर्शी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी धामणगाव आणि मोर्शी हे विधानसभा मतदारसंघ अमरावतीतील आहेत. या लोकसभा मतदारसंघात तेली आणि कुणबी या दोन्ही समाजाचे मतदार बहुसंख्येने आहेत.

भंडारा-गोंदियात विजयाचा गुलाल कोण उधळणार? - सुनील मेंढे (भाजप) VS नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)

आघाडीच्या वाटाघाटीनुसार भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा 2014 च्या निवडणुकीत नाना पटोंलेनी पराभव केला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर निवडून आले.

दुसरीकडे, नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडेंनी पोटनिवडणुकीत ही जागा जिंकली. त्यामुळे भंडारा-गोंदियाची जागा परत मिळवण्यासाठी भाजप उत्सुक आहे. भाजपकडून भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे रिंगणात आहेत.

मेंढेंविरोधात पुन्हा कुकडेंना उमेदवारी न देता राष्ट्रवादीने माजी मंत्री नाना पंचबुद्धे यांना मैदानात उतरवलं आहे. ते जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. भाजपचे माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांचं बंड शमलं असलं, तरी भाजपचे बंडखोर राजेंद्र पटले यांचं आव्हान आहेच.

भंडारा जिल्ह्यातील तीन आणि गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला हा लोकसभा मतदारसंघ.
कुणबी, पोवार, तेली, एससी, लोधी, कलार हे प्रमुख समाज घटक या मतदारसंघात आहेत. यंदा भंडारा-गोंदियाला नवीन खासदार मिळणार आहे.

'गड'चिरोली चिमुरचा गड - अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)

माओवादाची झळ सोसणारा गडचिरोली चिमुर हा लोकसभा मतदारसंघ अनुसचित जमातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात या मतदारसंघाचे राजकारण केंद्रित आहे. या लोकसभा मतदार गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर
ब्रह्मपुरी या दोन, तर गोंदियातील आमगाव या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेतेंनी 2014 च्या निवडणुकीत गडचिरोली-चिमुर ही जागा जिंकून डॉ. नामदेव उसेंडींना हरवलं होतं. त्यामुळे भाजपच्या हातातून ही जागा खेचून आणण्याचा उसेंडींचा प्रयत्न असेल, यात वाद नाही. वंचित कडून चिमूरचे माजी आमदार रमेश गजबे रिंगणात आहेत. माना समाजाची या भागात लक्षणीय मतसंख्या आहे.

रामटेकवर झेंडा कोणाचा? कृपाल तुमाणे (शिवसेना) VS किशोर गजभिये (काँग्रेस) 

काँग्रेसचा बालेकिल्ला न राहता, शिवसेनेचा गड झालेल्या रामटेकवरील भगवा कायम राखावा म्हणून भाजपला शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

सावनेर, रामटेक, हिंगणा, काटोल, उमरेड, कामठी असे सहा विधानसभा मतदारसंघ सामावून घेणाऱ्या या लोकसभा
मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केले आहे. 1957 मध्ये अस्तित्वात आलेला हा मतदारसंघ नागपूरला लागून असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. 2009 चा अपवाद वगळता 1999 पासून रामटेकवर शिवसेनेचा भगवा फडकत आला आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपला शिवसेनेच्या 'गयारामां'चं आव्हान हंसराज अहिर (भाजप) VS बाळू धानोरकर (काँग्रेस) 

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर चौथ्यांदा चंद्रपुरातून खासदारपदी विराजमान होण्यास उत्सुक आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू उर्फ सुरेश धानोरकरांचं आव्हान आहे. त्यामुळे भाजपला शिवसेनेच्या 'गयारामां'चा सामना करावा लागणार आहे.

चंद्रपुरातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, तर यवतमाळमधी वणी आणि आर्णी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघामध्ये होतो.

यवतमाळ-वाशिममध्ये विजयाची माळ कोणाला? भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)

यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. तर बच्चू कडू यांच्या 'प्रहार'कडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Lok Sabha Election LIVE UPDATE | विदर्भातील सात जागांसह देशभरात 91 मतदारसंघांमध्ये मतदान


राज्यात 3 लाखांहून अधिक दिव्यांग मतदार, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

माओवाद्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या इशाऱ्यानंतर गडचिरोली-चिमुर मतदार संघात अतिरिक्त पोलीस बल तैनात

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?

'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली

पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान