अहमदनगर : विखे-थोरात यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना श्रीरामपूर येथील प्रचार कार्यालयाच्या मुख्य बोर्डवर त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. सोनिया गांधी ते बाळासाहेब थोरात आणि थोरातांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे यांचा फोटो देखील बोर्डवर छापण्यात आला आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो का डावलला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे विखे समर्थक मानले जातात. मात्र श्रीरामपूर येथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं. कांबळेंनी बाळासाहेब थोरातांची मदत घेतल्याने विखे-पाटील हे कांबळेपासून दूर आहेत.



राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे सुजय विखे भाजपात गेल्यानंतर विखे पाटलांच्या काँग्रेस निष्ठेवर थोरातांनी हल्लाबोल केला होता. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले आहेत. विखेंपेक्षा मोठं होण्याची संधी यामुळे बाळासाहेब थोरातांकडे आली आहे. थोरातांनी संपूर्ण प्रचार यंत्रणा कांबळे यांच्या पाठीशी उभी केली आहे.


बाळासाहेब थोरात यांनी फायदा उचलत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना एकत्र करत विखे पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधली आहे. स्टार प्रचारक असेलेले राधाकृष्ण विखे पाटील मुख्य बोर्डवर का नाहीत? असं विचारल्यावर मोठ्या नेत्यांचे फोटो आहेत परंतु ते (राधाकृष्ण विखे पाटील) त्यापेक्षा मोठे आहेत. मोठ्या नेत्यांचे फोटो बाकी आहेत ते नंतर लावणार आहोत, असा उपरोधिक टोला थोरातांनी लगावला आहे.