बंगळुरु : आयपीएलमध्ये आज पुन्हा एकदा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सने बँगलोरने दिलेले 206 धावांचे आव्हान सहज पार करत तिसरा विजय साजरा केला. बँगलोरचे आव्हान कोलकात्याने 19.1 षटकात 5 गड्यांच्या बदल्यात पार केले. केकेआरच्या आंद्रे रसेलने अक्षरशः बँगलोरच्या तोंडचा घास हिरावला.

206 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरल्यानंतर कोलकात्याला सलामीवीर ख्रिस लीनने (31 चेंडूत 43 धावा)सावध सुरुवात करुन दिली. त्याला रॉबिन उथप्पाने (25 चेंडूत 33 धावा)चांगली साथ दिली. त्यानंतर आलेल्या नितीश राणाने (23 चेंडूत 37 धावा)कोलकात्याला विजयाच्या समीप नेले. तरीदेखील अंतिम षटकात सामना कोलकात्याच्या हातून निसटून जातोय असे वाटत असताना आंद्रे रसेलने जोरदार फटेकबाजी करत विजयश्री खेचून आणली. रसेलने केवळ 13 चेंडूत 7 षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने 48 धावा केल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना विटाटसेनेनेदेखील चांगली फलंदाजी केली होती. कोहलीचा रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा संघ आज मालिकेत पुनरागमन करेल असे वाटत होते. आजच्या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर बँगलोरने कोलकात्यासमोर 205 धावांचा डोंगर उभा केला होता. विराट कोहलीने आज 20-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पादेखील पार केला.

बँगलोरचा संघ आज पहिल्याच षटकापासून करा किंवा मरा अशी तयारी करुण आला असल्याचे दिसत होते. विराट सेनेने पहिल्याच षटकात 13 धावा चोपल्या. पॉवर प्लेमध्ये बँगलोरच्या सलामीवीरांनी बिनबाद 53 धावा केल्या होत्या. बँगलोरला सलामीवीर पार्थिव पटेल (24 चेंडूत 25 धावा)चांगली सुरुवात करुन दिली. पार्थिव आऊट झाल्यानंतर सामन्याची सुत्र कोहली आणि डिव्हिलियर्स जोडीने हाती घेतली. कोहली (49 चेंडूत 84 धावा), डिव्हिलियर्स (32 चेंडूत 63 धावा)आणि मॉर्कस स्टॉनिसने (13 चेंडूत 28 धावा)बँगलोरला 205 धावांपर्यंत मजल मारुन दिली होती. आजच्या सामन्यात दोन्ही संघांचे गोलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले.