मुंबई : जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मी त्यांच्यावर रागावलो होतो.  मी त्यांना सांगितलं हे करू नका.  ह्यात तुमचं, महाराष्ट्राचं आणि आपल्या विचाराचे नुकसान आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. 'मी हा निर्णय आनंदाने घेत नाही', असं देखील राणे म्हणाले होते. माझ्या हृदयात माझे नेते म्हणून दोन नेत्यांचे स्थान आहे मुंडे साहेब आणि राणे साहेब, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नारायण राणे यांची स्तुती केली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी पुस्तक 'नो होल्ड्स बार्ड' आणि 'झंझावात' या मराठी आवृत्तीचे प्रकाशन नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले.

गडकरी यावेळी म्हणाले की, राणे साहेबांच्या जीवनात त्यांनी छलकपट कधी केले नाही. ते काँग्रेसमध्ये गेले नसते तर आज राजकारणाचं वेगळं चित्र असतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं.  तुम्ही असाच संघर्ष करत राहा, आपण एकमेकांचा हात पकडला आहे. तुम्ही कोणत्याही पक्षात जा. असं होणार नाही, पण तरीही आपण एकत्र राहू, असेही गडकरी म्हणाले.

पुस्तकात 25 टक्के इतिहास आला आहे, 75 टक्के इतिहास आम्हाला माहिती आहे. पण कदाचित तो समोर मांडता येणार नाही, असेही गडकरी म्हणाले.  झंझावात हा शब्द राणेंच्या नेतृत्वाला साजेसा आहे. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याने मेरिट मिळवलं की चर्चेचा विषय होतो. त्याप्रमाणे राणे यांचे आयुष्य आहे. राणेंच्या स्वभावात आणि माझ्यात एक साम्य आहे. आम्हाला छल कपट जमत नाही. आम्ही दोघे स्ट्रेट फॉरवर्ड आहोत. या पुस्तकाच्या पलीकडे राणे साहेबांचे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे. राजकारणात पद नसताना मैत्री कमी होते. पण माझी आणि राणेंची मैत्री कायम राहिली, असेही गडकरी म्हणाले.

राणेंनी दोनपैकी एक 'चिठ्ठी' उचलून काँग्रेस प्रवेश : शरद पवार
नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण कार्यकाळ कमी मिळाला, त्यांना जर पूर्ण कार्यकाळ मिळाला असता तर महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री मिळाला असता.  राणे यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्याय सहन करायचा नाही, हा त्यांचा स्वभाव त्यांना शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता. या घालमेलीतून त्यांनी शिवसेना सोडली. मात्र त्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणत्या पक्षात जावं? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मग त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या. एक राष्ट्रवादी आणि दुसरी  काँग्रेसची. त्यातली एक चिठ्ठी उचलली, ती काँग्रेसची होती. आता ही चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रंगत आणली.