मुंबई : उद्धव ठाकरे हे स्वार्थी नेते आहेत, स्वार्थाशिवाय ते कुणालाही जवळ करत नाहीत. ज्या राज ठाकरेंना त्यांनी छळलं त्यांना आता स्वार्थासाठी जवळ केलं अशी टीका राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केली. ठाकरे बंधूंच्या युतीतून मराठी माणसाला काहीही मिळणार नाही, त्यांच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही लढतोय असंही नितेश राणे म्हणाले. त्याचवेळी मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्यांना रोखायचं असेल तर 'आय लव्ह महादेव'वाल्याला पालिकेत बसवा असंही ते म्हणाले. राजकारणाचा कंटाळा आलाच तर संघामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करेन असं सांगत नितेश राणे यांनी संघाच्या कामाचं कौतुक केलं. एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक (Coffee With Kaushik) या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.
कॉफी विथ कौशिकमध्ये नितेश राणेंनी मांडलेले मुद्दे त्यांच्याच शब्दात,
यांच्या युतीमुळे मराठी माणसाला काही मिळणार नाही
स्वार्थ नसेल तर उद्धव ठाकरे कधीच कुणाजवळ गेले नाहीत. ज्या राज ठाकरेंना त्यांनी छळलं, त्यांच्या जवळ जाणे हे लोकांना पटलंय का हे 16 तारखेला समजेल. उद्धव ठाकरे हे अतिशय स्वार्थी व्यक्ती आहेत. यांच्या युतीतून मराठी माणसाला काहीही मिळणार नाही. माझं कुटुंब, माझी जबाबदारी हे त्यांचं सूत्र आहे. मराठी माणसाच्या हिताचं काहीही मिळणार नाही.
वसई-विरार. नालासोपाऱ्याला मराठी माणूस राहायला गेला आहे. मराठी माणसाचं दरडोई उत्पन्न वाढायला पाहिजे होते ना? का मराठी माणूस गेला मुंबईतून बाहेर? त्याचवेळी मात्र बांगलादेशी नागरिकांचा टक्का वाढलेला आहे. ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी ही लढाई आहे. मराठी माणसाला मुंबईत परत आणण्यासाठी ही लढाई आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने मुख्य कलाकार मैदानात उतरतील. देवेंद्र फडणवीस, राणे साहेब मैदानात दिसतील. लोकांना हवे आहेत हे देखील चेहरे दिसतील. मुंबईला ठाकरेंच्या कचाट्यातून बाहेर काढायचं आहे. मुंबईतील हिंदूला वाचवावं लागेल, मराठी माणसाला मुंबईत पुन्हा आणण्यासाठी आम्ही प्रचार करतो आहे.
ठाकरेंचं वाकरे केलं तर?
सिंधुदर्गात मोठ्या प्रमाणात साटम आहेत. ही अडनावं नाहीत, साटम हे फक्त व्यक्ती नाहीच, त्याला मानसन्मान आहे. काही पत्रकार त्यांना मग ठाकरे भाषा बोलतात म्हणतात. ठाकरेचं वाकरे केले तर? उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर कोकणात चीड आहे. बाळासाहेब आणि कोकण यांचं वेगळं नातं आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी काय केलं? भास्कर जाधव काठावर पास झाले आहेत. येत्या महापालिकेत हीच परिस्थिती दिसेल. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर कोकणी माणूस चांगल्या पद्धतीनं मतदानातून उत्तर देईल.
बांगलादेशींमुळे मुंबई सुरक्षित नाही
मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंगे 30 टक्क्यांनी वाढले आहेत असा टिसचा अहवाल आहे. मग आपण खरंच सुरक्षित आहोत का? यांना कुणी आणलं आहे? हिंदू मुस्लिम दंगल पेटली आणि अचानक तुमच्या घराजवळ आली तर काय? झोमॅटो, स्वीगी डिलिव्हरी बॉय कुठला असतो काय माहिती? तो बांगलादेशी आहे का? सुरक्षित राहायचं असेल तर मुंबईची निवडणूक त्यावरच लढली पाहिजे.
आमच्या 12 महिन्याची कारकिर्द बघितली, तर बांगलादेशींना डिपोर्ट करण्याची संख्या बघा. सरकारमध्ये आम्ही बसलो आहोत आणि आम्ही ते सहन करणार नाही हे त्यांना माहिती आहे.
'आय लव्ह महादेव'वाल्याला पालिकेत बसवा
पालिकेत आपण का जातो? गटर, वॉटर आणि मीटरसाठी. पण रोहिंग्या बांगलादेशींना कनेक्शन दिले जात असेल तर काय करायचं? त्यामुळे महापालिकेत योग्य विचाराची सत्ता पाहिजे. अनधिकृत कनेक्शन देणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी पालिकेत सत्ता महत्त्वाची आहे. गोवंडी, मानखुर्दमध्ये गेलात तर पाकिस्तानच्या कराचीत उभे आहे असं वाटेल. मुंबईतील हिंदू जनसंख्या कमी कशी होईल, यासाठी विरोधकांचा प्रयत्न आहे. यांना थांबवायचं असेल तर 'आय लव्ह महादेव'वाल्याला पालिकेत बसवा, बांगलादेशींना काही मिळवू देणार नाही.
जिहादी मुस्लिमांविरोधात लढतोय
नितेश राणे म्हणाले की, "आम्ही जिहादी मुस्लिमांविरोधात आहोत, सामान्य मुस्लिमांच्या विरोधात नाही. देशात ज्यांना जिहाद करायचा आहे, इस्लाम राष्ट्र करायचं आहे, मशिदी अनधिकृतपणे उभ्या करायच्या आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. कोकणातील मुस्लिमांना सगळं माहिती आहे, त्यांना माहिती आहे मी त्यांच्यासाठी बोलत नाही. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. मी काही केलं तर त्यांना चुकीचं वाटणार नाही."
काँग्रेसमध्ये जाणं हा नाईलाज होता. राणे साहेबांचा संघर्ष आजही पटतोय. संतोष धुरी पण तेच सांगत होता. हिंदू म्हणून मी माझ्या भुमिकेवरुन कधीच हटलो नाही. 39 वर्षे आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालो आहोत. 12 वर्षे काँग्रेसमधील प्रवास सोडला तर आमची चांगल्याने घरवापसी झाली आहे असं मत निलेश राणे यांनी व्यक्त केलं.
ओवैसी हिंदूविरोधी अजेंडा राबवतात
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "औवेसी सभा घेतात तेव्हा त्यात राजकारण कमी आणि धर्म वाढवणं जास्त असतं. ते चांगले मुद्दे मांडताना कधीही दिसणार नाहीत. त्यामध्ये तुम्हाला कलमा, कुराण, अल्लाच्या शपथा दिसणार. एमआयएम हा पक्ष पाकिस्तानच्या आयएसआय आणि पीएफआयपेक्षा कमी आहे का? फक्त हिंदूंविरोधात लोकांना पेटवणं इतकंच त्यांच्याकडे चालतं. अशा राजकीय पक्षांना निवडणुका आपण निवडणूक लढवायला का देतो हा मला प्रश्न पडतोय. यांचे इस्लाम राष्ट्र बनवण्याचे मनसुबे सुरु आहेत."
धर्मासाठी आक्रमक होणं वाईट नाही
माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "अमेरिका, युके युरोपची काय परिस्थिती आहे? मुस्लिम घरातील लोकांची संख्या बघा. योजनेसंदर्भात त्यांना मोदी पाहिजेत, आणि मतदानावेळी त्यांना अल्ला आणि कुराण पाहिजे. नवनीत राणांचा मुद्दा समजून घेतला पाहिजे, हा मतदानाचा मुद्दा नाही. धर्मासाठी आक्रमक होणं वाईट नाही, कोणीतरी ढाल बनलं पाहिजे. लव्ह जिहादमुळे अनेकांच्या आयुष्याची वाट लावली जातेय. त्यामुळे धर्मासाठी जगायला संधी मिळत असेल तर काही वाईट वाटत नाही."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करताना नितेश राणे म्हणाले की, "राष्ट्रासाठी वाहून जाणं, हिंदुत्वासाठी राष्ट्रीयत्व म्हणजे संघ. संघ मी संपूर्णपणे जवळून समजून घेतला आहे. जर राजकारणाचा कंटाळा आला तर संघात काम करायला आवडेल. 24 तास राजकारण करणारा मी व्यक्ती नाही, पदावरच राहिले पाहिजे अशीही अपेक्षा नाही. स्वयंसेवकासारखं राहा म्हटलं तरी मी तसा राहीन."
हिंदुत्वाप्रमाणे विकसनशील व्यक्ती म्हणून चित्र
मुंबईच्या विकासासंबंधी ध्येय मांडताना नितेश राणे म्हणाले की, "मुंबईत जलवाहतूक मला सुरू करायची आहे. मेट्रो जाळे जे शहरात होतायत तसं मुंबई वॉटर मेट्रो यासंदर्भात काम करतोय. डिसेंबर 2026 ला 3 रूट सुरु करण्यासाठी काम करतोय. मुंबईत वर्ल्ड क्लास ॲक्वॅरिअम उभं राहील. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटण वाढणार आहे. फ्लोरेल आम्ही तयार करत आहोत, मरीन ड्राईव्ह तुम्हाला वेगळा दिसेल. मेरिटाइम बोर्डच्या माध्यमातून रोजगार निर्मित करु शकतो. जहाज बांधणीत आणि तोडण्यात आपण नाही, आता यात मुंबईला पुढे आणायचं आहे आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात करायची आहे. हिंदुत्व म्हणून ओळखता तसं माझ्या कारकिर्दीत तुम्हाला विकसनशील व्यक्ती म्हणून देखील माझं चित्र दिसेल."
रश्मीताईंचा फोन येतो
वडिलांनी पोटात तेच ओठात असंच राजकारण केलं. आज जे आम्ही भक्कम दिसतो त्याला कारण वडिलांचा प्रवास आम्ही पाहिला आहे. शिवसेना सोडल्यानंतर काही गोष्टी घरांपर्यंत यायला लागल्या, 'बिलो द बेल्ट' यायला लागले. आमच्या वडिलांना तुम्ही नावं ठेवली, आम्ही बोललो तर तुम्ही फोनाफोनी करणार. राजकारणात कधीतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे. रश्मीताईंचा फोन येतो मग, आता नाही त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या आहेत.
बाळासाहेबांवर नितांत प्रेम केलं आहे राणे साहेबांनी. शेवटच्या दिवसात त्यांना भेटायला दिलं नाही, ही खंत राणे साहेबांच्या मनात आहे. वडील म्हणून राणे साहेब अतिशय प्रेमळ, मात्र तेवढेच शिस्तीचे.
आम्ही दोघे घडलो ते त्यांच्यामुळे. आमच्यावर त्यांनी कधीही हात उचलला नाही. घरातल्या राणे साहेबांना तुम्ही ओळखू शकणार नाहीत, घरातले राणे साहेब अतिशय वेगळे आहेत.
राणे एकत्र दिसतील
कणकवली नगरपालिकेमध्ये पराभूत झाल्याचं दुःख नाही. विरोधकांनी हरवलं नाही, मोठ्या भावासमोर मी हरलो आणि तो जिंकला तर त्यापेक्षा अधिक सुख काय? तो एक एपिसोड होता, कार्यकर्ते खूप शिकले. आपली ताकद एकसंघ असेल तेवढी आम्ही जनतेची सेवा करु. राणे ब्रँड असो, भाजप किंवा शिवसेना असो, आम्ही एकत्र दिसू.
निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात संवाद झाला असता तर बरं झालं असतं. प्रदेशाध्यक्ष म्हणून ते मोठे होते, संवाद साधला असता तर बरं झालं असतं. भावनेच्या भरात निलेशजींनी स्टिंग ऑपरेशनचे पाऊल उचललं होतं. त्यांच्या मतदारसंघात ती नगरपंचायत होती, त्यामुळे तिथे पण न्याय मिळू शकला असता. भावनेच्या भरात काही गोष्टी करुन जातो. ज्या कार्यकर्त्यांकडे ते गेले आज ते देखील निलेशींसोबत होते.
निलेश आणि नितेशजी यांचे नाते भावनिक आहे, दोघे एकमेकांना सांभाळून घेतले आहेत. अमित देशमुख, विश्वजीत कदम यांच्यासोबत आपले चांगले संबंध आहेत. मी कुणाला राजकीय शत्रू मानत नाही, स्पर्धक मानतो. आदित्य ठाकरेंचं मी 2019 साली अभिनंदन केलं होतं.
राजकारणात पुढील ध्येय काय?
ध्येय सांगून मी माझी विकेट का काढून घेऊ? माझा प्रवास अनपेक्षित आहे, इतकी मोठी जबाबदारी येईल असं वाटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस माझे मार्गदर्शक आहेत, मला त्यांनी तयार केलं. त्यांना जशी जशी मदत लागेल तेव्हा तेव्हा मी तयार असेल. त्या माणसाचा मोठा प्रभाव माझ्यावर आहे.
देवेंद्र फडणवीस बनायची इच्छा असेल तर त्यांच्यातले गुण आत्मसात करावे लागतील. देवेंद्रजी प्रत्येकाला सांभाळून घेतात, समोरच्याला काय पाहिजे हे त्यांना माहिती असतं. प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस बनायची इच्छा आहे, पण त्यासाठी त्याचे गुण आत्मसाद करावे लागतील असं नितेश राणे म्हणाले.
ही बातमी वाचा: