Continues below advertisement

मुंबई : राज्य सरकारचे त्रिभाषा सूत्र धोरण हे ट्रिगर ठरले आणि दोन भाऊ एकत्र आले. आता समोर कुणीही आलं तरी त्याला सपाट करण्याची ताकद ही दोन भावांमध्ये आहे असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईकरांना स्वस्तात घरे उपलब्ध करून द्यायची आहेत, बेस्टची वाढलेली भाडेवाढ कमी करायची आहे असं सांगत आमच्यासाठी मुद्दे महत्त्वाचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.

Aaditya Thackeray Podcast : उद्धव ठाकरे अस्सल मुंबईकर मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री बनले ते अस्सल मुंबईकर म्हणून मुख्यमंत्री बनले. विविध महापलिकांमध्ये आमच्या काळात अनेक गोष्टी झाल्या. पर्यावरण नष्ट होऊ नये यासाठी आमचा लढा सुरु आहे. नॉर्थ आणि साऊथ बाउंड कोस्टल वेगळे केले हे एवढंच काम देवेंद्र फडणवीस यांचं आहे. आम्ही साऊथ बाउंड कोस्टल रोडचं काम आमच्या काळात सुरु केलं असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

Continues below advertisement

नरगपालिका निवडणुकीत तीन सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात लढले. त्यांनी किती खालच्या पातळीवर राजकारण केलं हे विरोधकांनी दाखवले. महाराष्ट्राचं राजकारण भाजपने गढूळ केलं. या सगळ्या प्रदूषणामध्ये लोकांना आमची फाइट दिसली नसेल असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Aaditya Thackeray BMC Election : एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय

आदित्य ठाकरे म्हणाले की, "कोणीही कितीही म्हणा, पण निवडणुका या मतांसाठी असतात. दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, महाराष्ट्राची ताकद वाढली आहे. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. शिवसेना मनसे आम्ही एकत्र आलो आहोत आणि मनापासून एकत्र काम करतोय. एक जेष्ठ नागरिक म्हणाले की, 'आता वेगळे होऊ नका. आम्ही कोणत्या पक्षाचे नाही, उद्धव-राज ठाकरे एकत्र यावेत याची वाट पाहत होतो.' त्यांचे डोळे पाणावले, या भावना आहेत."

Aaditya Thackeray On Marathi Manus : त्रिभाषा सूत्र हे एकत्र येण्याचा ट्रिगर

शिवसेना-मनसे युतीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "जर दोन भाऊ एकत्र आले तर चांगल्या लोकांच्या पोटात दुखणार नाही. भाऊ बीज असो किंवा इतर कार्यक्रम असो, आम्ही एकत्र आलो तेव्हा आमच्यात अंतर आहे असं कधी वाटलं नाही. दोन भावांमध्ये एवढी ताकद आहे की समोर कुणीही आलं तर त्याला सपाट करु शकतात. त्रिभाषा सूत्र हे एकत्र येण्याचा ट्रिगर ठरला. दोन भावांनी एकत्र यायचं ठरवल्यानंतर मध्यस्त कुणीच नव्हतं, ते सगळं नॅचरल झालं. दोघांनीही वातावरण घरच्यासारखं ठेवलं."

मराठी भाषा आणि मराठी माणसासाठीचा हा संयुक्त महाराष्ट्रानंतरचा सगळ्यात मोठा लढा आहे. मुंबई एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. महापालिकेच्या निवडणुकीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आम्ही जनता काय म्हणते हे ऐकायला उत्सुक आहोत, आमच्यासाठी जनतेचा कौल महत्वाचा असेल. आमच्यासाठी मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यासाठी काल प्रेझेंटेशन दिलं. पण भाजपची टॅग लाईन म्हणजे हिंदू-मुस्लिम, भाषावाद. आता निवडणुकीत भाजपवाले हे सगळं काढणार."

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एवढा निर्लज्जपणा कुठून येतो?

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "दुसऱ्या बाजूला जी शिवसेना आहे ती फ्रॉड सेना आहे. एकनाथ शिंदे रोज आरशात कसे काय बघू शकतात? एकनाथ शिंदेंना पहिले तिकीट आणि मंत्रिपद हे उद्धव ठाकरे यांनीच दिलं. मग उद्धव साहेबांवर टीका करणे, त्यांची सुरक्षा कमी करण्याएवढा निर्लज्जपणा कुठून येतो? हा सगळा गलिच्छ प्रकार आहे."

मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं. ते म्हणाले की, "एकनाथ शिंदेंनी आमच्या समोर बसावं आणि गेल्या तीन वर्षात त्यांनी काय काय केलं ही माहिती द्यावी. मी त्यांना चॅलेंज देतो, माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत. मुंबईतील रस्ते घोटाळे असो वा त्यांच्या विभागातील घोटाळे असोत, समोरा-समोर बसून बोलू."

Aaditya Thackeray Mumbai : मुंबईसाठी काय करणार?

'करुन दाखवलं' असं म्हणणारा एकमेव पक्ष हा आमचा आहे. भविष्यात मराठी माणसाला मुंबईत घरं द्यायची आहेत. बेस्टचे तिकीट 5,10,15,20 रुपये करायचे आहेत. जुने मार्ग पुन्हा सुरु करायचे आहेत. बीएमसी शाळेत ज्युनिअर कॉलेज सुरु करायचं आहे. शहरासाठी भाजप-शिंदेंनी काय केलं हे दाखवावं? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "बीएमची इस्टेट प्रॉपर्टीला राज्य सरकारचा काही संबंध नाही. बेस्टचे भाडे यावर राज्य सरकारचा काय संबंध? सध्याच्या परिवहन मंत्र्यांना रॅपिडो सुरू करायचे आहेत आणि नंतर बेस्टचे डेपो विकायचे आहेत. नगरविकास मंत्री यांना त्यांचा विभागात काय होत हे माहित नाही. मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुण्यामध्ये जेव्हा आमचे महापौर बसतील तेंव्हा यांचे घोटाळे बाहेर येतील."

Aaditya Thackeray Interview : काँग्रेसवर काय म्हणाले?

काँग्रेससोबतच्या युतीच्या चर्चांवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "काँग्रेसमध्ये दोन प्रवाह आहेत. काही नेते म्हणाले की सोबत यायला हवं. पण त्यांना जर वाटत असेल की वेगळे लढले तर त्यांच्या जास्त जागा येतील तर ते चांगलं आहे. काही नेते काँग्रेस म्हणाले की आम्ही सोबत यायला तयार होतो. त्याचं नाव सांगणार नाही, आम्ही काडी लावून पळून जाणारे भाजपवाले नाही."