मुंबई : नितेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न करताच एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आज अकरा वाजता तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. तर चार ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितेश राणे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणे यांचं नाव थेट उमेदवारी यादी दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काल, रात्री नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा निर्णय झाला असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 'फक्त काही तास बाकी, वादळा पूर्वीची शांतता' असं ट्वीट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे.


दरम्यान, स्वत: मुख्यमंत्री नितेश राणेंसाठी कोकणात सभा घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.  दरम्यान, 2 ऑक्टोबरला नारायण राणे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये नारायण राणेंच्या भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार होता. मात्र आता नितेश यांना सरळ उमेदवारीच घोषित केली असल्याने आणि त्यांना एबी फॉर्म दिला जात असल्याने औपचारिक प्रवेशाची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांच्याकडे स्पष्ट केले आहे.

यामुळे आता नारायण राणेंबरोबरच त्यांची दोन्ही मुलं नितेश आणि निलेश हे देखील भाजपचा झेंडा हाती धरणार असल्याची माहिती आहे. दरम्यान नारायण राणेंनी जन्माला घातलेला स्वाभिमान पक्षच भाजपात विलीन करण्याचे संकेत नारायण राणेंनी दिले होते. दरम्यान राणेंच्या भाजपप्रवेशाला शिवसेनेनं हिरवा कंदील दाखवला का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शिवसेनेचा विरोध मात्र कायम
दरम्यान नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेकडून मात्र टीका केली जात आहे. राणे ज्या पद्धतीची लाचारी करत आहेत, ती कार्यकर्त्यांना आवडणारी नाही. मुलांची आमदारकी शाबूत राहावी यासाठी ते कार्यकर्त्यांचा बळी देत आहेत. मात्र भाजपमध्ये जाण्यापूर्वी राणेंनी मागे वळून पाहिलं तर पाठीमागे कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत, अशी त्यांची आजची परिस्थिती आहे," अशा शब्दात गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.  ज्यांची राजकीय कारकीर्द हिंसेची राहिली अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचंही दीपक केसरकर म्हणाले. तसंच शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचा ठाम विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला होता.