मुंबई: आज केंद्रात आमच्या विचाराचं सरकार आहे. हे सरकार पुढील साडेचार वर्षे सत्तेत राहणार आहे. पण राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे का, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला. ते बुधवारी एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असण्याची गरज व्यक्त केली.
आमच्या सरकारच्या योजना चांगल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय ठरली. आज केंद्रात आमच्या विचारांचं सरकार आहे. पुढील साडेचार वर्षे ते सरकार राहणार आहे. त्याच विचारांचं सरकार राज्यात आलं तर आम्हाला अधिक मदत घेता येईल. यामुळे महाराष्ट्रातील लोकांचा फायदा होईल, विकासकामांसाठी अधिक निधी मिळेल. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांना झुकते माप मिळाले. पण राज्यात दुसऱ्या विचारांचं सरकार आलं तर केंद्र सरकार त्यांना मदत देणार आहे का? जे काही नियमाने असेल तरे मिळेल, त्यापेक्षा अधिक काही मिळणार नाही. पण आम्ही सत्तेत आलो तर महाराष्ट्रालाही केंद्र सरकारकडून बिहार आणि आंध्र प्रदेशसारखी मदत मिळेल, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु राहील, असेही स्पष्ट केले. महाराष्ट्राचा वार्षिक अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटी रुपयांचा होता. दरवर्षी त्यामध्ये 10 टक्क्यांची वाढ होते. यापैकी साडेतीन लाख कोटी रुपये पगार, पेन्शन आणि कर्जाचे व्याज यासाठी जातो. बाकी पैसे योजना आणि मुलभूत गरजा भागवण्यासाठी खर्च होतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा खर्च करण्यासाठी राज्य सक्षम आहे. राज्यातील कुठलीही योजना बंद पडणार नाही आणि विकासासाठीही निधी कमी पडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवारांचा नवाब मलिकांच्या उमेदवारीला पाठिंबा
या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या उमेदवारीचे समर्थन केले. एखादा व्यक्तीविरोधात नरेटिव्ह सेट करताना तेच तेच बोलून, त्याला बदनाम केले जाते. सातत्याने अशी गोबेल्स निती वापरली की लोकांचही मतपरिवर्तन होते. अनेक लोकांवर आरोप होतात. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर केवळ आरोप होणे ही वेगळी गोष्ट आहे आणि ते आरोप सिद्ध होऊन शिक्षा होणे, ही वेगळी गोष्ट आहे. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, हे आमचे मत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
साहेबांना मी दैवत मानलं, मी मुलासारखा, माझी नक्कल केली; अजितदादा म्हणाले, मला वेदना झाल्या!