मुंबई/यवतमाळ : निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच भोवलं आहे. आंबेडकरांविरोधात यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिग्रज पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

"पुलवामाच्या घटनेवर काही बोललं, की निवडणूक आयोग बंदी लावतं. ही यंत्रणा भाजपच्या हातातील बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना दोन दिवस तुरुंगाची हवा खायला पाठवल्याशिवाय राहणार नाही" असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती

निवडणूक आयोगाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी काल (बुधवारी) यवतमाळच्या दिग्रसमध्ये झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्याविरुद्ध दिग्रस पोलिसात कलम 503, 506, 189 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सत्तेत येऊ द्या, निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू : आंबेडकर

यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रसमधील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेवून डाव्या आणि वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

VIDEO | सत्ता आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू : प्रकाश आंबेडकर | एबीपी माझा



सत्तेत आल्यास केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची  जबाबदारी शासनाची असेल आाणि आरएसएस जेलमध्ये असेल, असंही आंबेडकर म्हणाले होते.

कॉंग्रेसचं नेतृत्त्व मोदींच्या राजकारणाचा बळी ठरत असून पक्षातील गांधी विचारधारा असलेल्या नेत्यांची गळचेपी होत आहे. तर पुलवामाची घटना ही 'मॅच फिक्सिंग' असून यावर काही बोललं की निवडणूक आयोग बंदी घालतं. ही यंत्रणा भाजपच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांनाही जेलची हवा खायला पाठवू, असा इशाराही आंबेडकरांनी दिला होता.