नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ रायबरेलीतील लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. भाजपने सोनिया गांधींविरोधात माजी काँग्रेस नेत्यालाच मैदानात उतरवलं आहे. दिनेश प्रताप सिंग रायबरेलीतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत.

दिनेश प्रताप सिंह हे 2016 साली दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आता त्यांनी थेट आपल्या आधीच्या पक्षाच्या माजी अध्यक्षांनाच आव्हान दिलं आहे.

दुसरीकडे, आझमगडमधून भोजपुरी गायक दिनेश लाल यादव भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. दिनेश लाल यादव हे 'निरहुआ' नावाने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आझमगड हा सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा बालेकिल्ला आहे.

सपाचे माजी अध्यक्ष मुलामसिंह यादव यांच्याविरोधात भाजपने प्रेम सिंह शक्य यांना मैदानात उतरवलं आहे. मैनपुरी या मतदारसंघातून मुलायमसिंह रिंगणात आहेत.

समाजवादी पक्षातून विलग झालेले मुलायमसिंह यांचे बंधू शिवपाल सिंह यादव यांनी प्रगतिशील समाजवादी पक्ष-लोहियाची स्थापना केली. ते फिरोझाबादमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने चंद्र सेन जडून यांना उतरवलं आहे. सपा नेते राम गोपाल यादव यांचे पुत्र अक्षय यादवही याच जागेवरुन रिंगणात आहेत.