सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांची उमेदवारी जाहीर करताना मतदार व इच्छुक उमेदवारांना चांगलीच प्रतिक्षा करावी लागल्याचं दिसून आलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ वेटिंगवरच ठेवला, मात्र मोहोळ (Mohol) मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम या तरुणीला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. विशेष म्हणजे आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी किमान 25 वर्षांची वयोमर्यादा आहे, तर सिद्धीने नुकतेच वयाची 25 वर्षे पूर्ण करुन 26 व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यामुळे, सिद्धी ह्या जिल्ह्यातील सर्वात तरुण महिला उमेदवार ठरल्या आहेत. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनीही सिद्धीच्या हुशारीबद्दल बोलताना, तिच्या शिक्षणाचे व तिच्याकडून होत असलेल्या सामाजिक कार्याचं कौतूक करत तिची उमेदवारी जाहीर केली आहे. 

Continues below advertisement


अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. ऐन निवडणुकीत अजित पवारांकडून त्यांना खुश करण्यात आलं आहे. महायुतीमध्ये ह्या जागेवरुन विद्यमान आमदार यशवंत माने यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी चांगलीच स्पर्धा सुरू होती. माजी मंत्री लक्ष्मणराव छोबळे यांचे सुपुत्र अभिजित ढोबळे यांनीही वरिष्ठ पातळीवरुन शरद पवारांकडे फिल्डींग लावली होती. तर, कॉंग्रेसचे रॉकी बंगाळे, संजय क्षीरसागर, राजू खरे यांचीही नावे आघाडीवर होती. तर, रमेश कदम यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र, शरद पवारांनी मतदारसंघाची वस्तूस्थिती ओळखून व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सिद्धीला मैदानात उतरवलं आहे.


उच्चशिक्षित व सोशल बॉण्डींग


सिद्धी रमेश कदम या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. मुंबईतील जगप्रसिद्ध टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांपैकी सर्वात तरुण उमेदवार सिद्धी कदम आहेत. विशेष म्हणजे वयाच्या 20 व्या वर्षीच विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारयंत्रणा व मनुष्यबळ सांभाळून नेतृत्व केल्याचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. 


वयाच्या 20 व्या वर्षीच वडिलांशिवाय विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व 


सिद्धी रमेश कदम हिने गत 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्धच प्रचार यंत्रणा राबवून तगडी फाईट दिली होती. विद्यमान आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांनाच वडिलांसाठी टक्कर दिली होती. कारण, 2019 साली सिद्धीचे वडील रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकारणात अटकेत होते, तेव्हा विधानसभा निवडणुकांची धुरा सिद्धीनेच सांभाळली. त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना 23 हजारांहून अधिक मतं मिळाली होती, त्यामध्येही सिद्धीच्या उत्तम नियोजनाचा व सोशल बॉण्डींचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळेच, या सर्व गोष्टींचा अभ्यास करुनच राष्ट्रवादीने एका यंग स्कॉलर गर्लला विधानसभेच्या रणांगणात उतरवलं आहे. दरम्यान, महिला सक्षमीकरण व महिला धोरणांसाठी शरद पवार नेहमीच आग्रही असतात, त्यातूनच त्यांनी युवती उमेदवार देऊन नवा डाव टाकलाय.


अनुभव व अनुभवी नेत्यांची सोबत


मी महिला सक्षमीकरण या विषयात टाटा इंस्टीट्यूट येथून मी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यामुळे, मतदारसंघातील महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न असेल, त्यादृष्टीने मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. माझ्या उमेदवारीमुळे तरुणांना राजकारणात संधी मिळते हे सिद्ध झालंय, मी 2019 मध्ये वडिलांसाठी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत असताना माझ्या पाठीशी अनेक अनुभवी नेते होते. यंदाच्या निवडणुकीतही मला त्या अनुभवी नेत्यांची साथ मिळणार असल्याचा विश्वास सिद्धी कदम हिने व्यक्त केला आहे.  


हेही वाचा


माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची लढत