येत्या काळातील राजकीय वाटचालीबद्दलचा निर्णय घेण्यासाठी काल उदयनराजेंच्या समर्थकांची एक बैठक बोलावण्यात आली होती. त्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, "जे काही होईल ते लोकांच्या हिताचं होईल. माझ्या सहकाऱ्यांना तुम्ही विचार करुन निर्णय घ्या आणि मला सांगा असं मी सांगितलं आहे. गेली 25-30 वर्षे ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने मला साथ दिली ते माझ्यासाठी महत्त्वाची आहेत", असं उदयनराजे म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी माझं एकही काम केलं नाही. मी सांगून कंटाळलो पण काम झालं नाही', असा आरोपही यावेळी उदयनराजेंनी केला आहे. "आम्ही लोकांकरिता लढलो, रस्तारोको केला, आमच्यावर केसेस झाल्या. काही कारण नसताना माझ्यावर खंडणीची केस दाखल झाली. 302,307 सारखे गुन्हे दाखल झाले. खोट्यानाट्या केसेस झाल्या", असं उदयनराजे म्हणाले.
तसेच 'राजकारण सुरु असतं. सत्ता इकडची तिकडं जाते, मंत्री बदलतात. मी सत्तेचा कधी अट्टहास केला नाही. मेगाभरतीला मी भीक घालत नाही, आम्हाला गरज पण नाही', असंही त्यांनी म्हटलं आहे.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशात चंद्रकांतदादांचा खोडा?