पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उशिरापर्यंत खलबतं
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2019 07:42 AM (IST)
शरद पवार यांच्या निवासस्थानी चाललेल्या या बैठकीला अजित पवार, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. चार तास चाललेली ही बैठक शुक्रवारी रात्री उशिरा संपली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत एकूणच राजकीय पक्षांचा आढावा घेण्यात आला. औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेवरुन आघाडीतला तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे या जागांच्या उमेदवारीचा प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न या बैठकीत करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. अहमदनगरच्या जागेवरुन निवडणूक लढवण्यास विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. ही जागा न मिळाल्यास सुजय राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच सुजय यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, शिरुर मतदारसंघातील उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. अजित पवारांनी जाहीर मतदान घेत विलास लांडे, देवदत्त निकम, पोपटराव गावडे आणि अमोल कोल्हे अशा चौघा जणांच्या नावाबाबत विचारणा केली. त्यावेळी लांडे, निकम आणि गावडे यांना अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र अमोल कोल्हे यांचं नाव घेताच सभागृहात एकच जल्लोष झाला होता.