मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सचिन अहिर यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत सचिन अहिर यांनी सर्व कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. यामध्ये त्यांनी काही संकेत कार्यकर्त्यांना दिले आहेत.


तुम्ही आणि मी आपण एकाच कुटुंबातील आहोत. काळाची गरज ओळखून पावलं उचलणं गरजेचं आहे. भविष्यात ठोस निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी मला तुमची गरज आहे. अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. लवकरच निर्णय घेऊ, त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे, असं सचिन अहिर कार्यकर्त्यांना म्हणाले. सचिन अहिर यांची ही बैठक जवळपास 8 वाजता झाली. आज सकाळी 11 वाजता सर्व सचिन अहिर समर्थकांना मातोश्रीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


आदित्य ठाकरेंचा मार्ग मोकळा?


आदित्य ठाकरे भविष्यात वरळी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढले तर या भागात विरोधी पक्ष संपवून शिवसेनेची मोठी ताकद उभी करता येईल. सचिन अहिर यांची वरळीच्या प्रेम नगर, सिध्दार्थ नगर, जिजामाता नगर, गांधी नगर आणि बीडीडी चाळींमध्ये मोठी ताकद आहे. भविष्यात आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहिले तर सचिन अहिरांच्या जवळ असलेली मतं शिवसेनेला मिळतील. विरोधी पक्षांची ताकद नसल्यानं आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेला आहे.


सचिन अहिरांना कोणती विधानसभा?


वरळी विधानसभेत याआधी सचिन अहिर यांनी काम केलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिर यांचा पराभव करत याठिकाणी विजय मिळवला. सुनिल शिंदे यांनी वरळी विधानसभेत कमी कालावधीत आपला ठसा उमटवला. त्यामुळे वरळी विधानसभा सचिन अहिर यांच्या हाताला लागण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे भायखळा विधानसभेसाठी सचिन अहिर इच्छुक असल्याची चर्चा आहे. सध्या भायखळ्यात एमआयएमचे वारिस पठाण आमदार आहे.



संबंधित बातम्या