मुंबई : आज (18 नोव्हेंबर 2024) संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. एकीकडे प्रचार जोमात चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण यावरही वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे नेतृत्त्व देण्याचं विधान केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते जंयत पाटील (Jayant Patil) यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. 


जनतेने मला आशीर्वाद दिला तर...


जयंत पाटील 'बोल भिडू'च्या यूट्यूब चॅनेलवर बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याची तुमची इच्छा आहे का? अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना जंयत पाटील यांनी मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. "राजकारणात असणाऱ्या प्रत्येकाचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. मी एकूण सात वेळा मी विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे. आता ही आठवी वेळ असेल. जनतेने मला आशीर्वाद दिला तर माझा विजय होईल. जनता यावेळीही मला आशीर्वाद देईल असं चित्र दसत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.


"..त्यानंतर आपण या मुख्यमंत्रिपदावर बोलूया"


तसेच, "इच्छा तर प्रत्येकाचीच असणार आहे. त्यात काही वावगं नाही. परंतु संख्येला फार महत्त्व असतं. त्यामुळे मला कुठली घाई नाही. महाराष्ट्रात संख्या 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ठरेल. त्यानंतर आपण या मुख्यमंत्रिपदावर बोलूया," असं जयंत पाटील म्हणाले.


महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते इच्छुक


दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जातात. शरद पवार यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यावर नेतृत्त्व सोपवण्यासंबंधीचे विधान केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) पक्षही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहे. असे असतानाच आता जयंत पाटील यांनीदेखील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आलीच तर नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा :


Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार


Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भरसभेत केली अमित शाह यांची मिमिक्री; डोक्यावर तेल लावा म्हणजे..., Video


Supriya Sule: शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर मोठं विधान; मनातली इच्छा सांगितली!