नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला होता. रेवंत रेड्डी यांनी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या  आणि अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं उदाहरण देत अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. ते म्हणाले तिसरा नेता तुम्हाला माहिती आहे, काँग्रेसनं त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री बनवलं, खासदार बनवलं, त्यांच्या वडिलांना पण मुख्यमंत्री बनवलं , काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची सर्व पदे दिली. अशोक चव्हाण यांनी त्या बदल्यात काय केलं काँग्रेस पक्षाला, गांधी परिवाराला आणि नांदेडच्या लोकांना धोका देऊन, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते मोदींच्या समोर जाऊन गुलामगिरी करत आहेत, अशी टीका रेवंत रेड्डी यांनी केली होती. या टीकेला भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे घेण्याची मला गरज नाही. आरएसएस , तेलुगू देसमला दगा देऊन ते काँगेस मध्ये आले, असं प्रत्युत्तर दिलं आहे.  


रेवंत रेड्डींनी पक्षनिष्ठा शिकवू नये


तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील जाहीर सभेत अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. गद्दार आणि धोकेबाज अशा शब्दांचा वापर त्यांनी अशोक चव्हाण यांच्या बद्दल केला होता.  अशोक चव्हाण यांनी रेवंत रेड्डी  यांना प्रत्युत्तर दिलं आहे.  रेवंत रेड्डी यांच्याकडून पक्षनिष्ठेचे धडे घेण्याची मला गरज नाही. त्यांचा इतिहास नांदेडच्या जनतेला माहीत नाही, मला माहीत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. आरएसएस आणि तेलुगू देसमला दगा देऊन काँगेसमध्ये आलेल्या रेवंत रेड्डी यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये असं अशोक चव्हाण म्हणाले.  


पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही


"अशोक चव्हाण यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहित नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत.  त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा" असं रेवंत रेड्डी म्हणाले होते. या वक्तव्याला देखील अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.   पैशाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत नाही. काँगेसने काय थैमान घातलंय ते पाहा जरा, असं अशोक चव्हाण म्हणाले. व महाराष्ट्रात तेलंगणाचा पैसा आलेला आहे. हा उद्योग सुरू झालेला आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असं अशोक चव्हाण म्हणाले. 


इतर बातम्या :


"अशोक चव्हाणांनी घाम गाळून पैसे कमावलेले नाहीत, त्यांचे पैसे घ्या; पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा"