मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर भारती पवार यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
प्रवेशानंतर बोलताना पवार म्हणाल्या की, आज मला मोठा परिवार मिळाला, यामुळे मला प्रेरणा मिळेल. भाजप हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री आहे. दिंडोरीमध्ये अनेक वर्षे कामं करून न्याय मिळाला नाही, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, भारती पवार यांच्या भाजपमध्ये प्रवेशाने दिंडोरीचे विद्यमान खासदार भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. चव्हाण हे गेल्या 3 टर्मपासून खासदार आहेत. भाजपचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे.
कोण आहेत भारती पवार
- पवारांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला बसणार मोठा धक्का
- धनंजय महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भारती पवार नाराज
- भारती पवार या शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या माजी मंत्री ए. टी.पवार यांच्या सुनबाई
- त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजपच्या प्रस्थापितांना दणका तर बसणार याशिवाय दिंडोरीतील राजकारण पेटणार
- मोदी लाटेतही भारती पवारांनी राष्ट्रवादीकडून लढत देत गेल्यावेळी लाखोंच्या घरात मते घेतली
- भारती पवार राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा
- नाशिक जिल्हा परिषद सदस्या
- स्वतः डॉक्टर असल्याने सुशिक्षित चेहरा
- ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश, खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचा पत्ता कट होण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2019 02:05 PM (IST)
विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री आहे. दिंडोरीमध्ये अनेक वर्षे कामं करून न्याय मिळाला नाही, असेही त्या म्हणाल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -