आधी लोकसभा जिंकू, मग विधानसभेची चर्चा, इंदापूरच्या जागेवरुन अजित पवारांनी सुनावलं
एबीपी माझा वेब टीम | 04 Mar 2019 01:34 PM (IST)
आम्ही लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय. आधी लोकसभा जिंकायचीय आणि नंतर विधानसभेबाबत चर्चा करु अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली. त्यामुळे इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा तिढा वाढणार असल्याची शक्यता आहे.
इंदापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय झाला, तरच आघाडीच्या उमेदवारांचं काम करु अशी भूमिका इंदापूरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली होती. मात्र, आधी लोकसभा जिंकायची आहे, मग विधानसभेबाबत चर्चा करु, असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना शांत बसवलं. राज्यात लोकसभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे. अशातच लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आघाडीचं काम करणार नाही अशी भूमिका काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात घेतली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसमोरच नेत्यांनी नाराजीचा सूर लावला होता. VIDEO | शरद पवारांच्या हस्ते गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं अनावरण | एबीपी माझा लोकसभेला आम्ही आघाडीचं काम करतो, मात्र त्यानंतर येणाऱ्या विधानसभेला नेहमी आमचा घात केला जातो, असा आरोप राष्ट्रवादीवर केला होता. त्यामुळे लोकसभेची आघाडी होण्याअगोदर इंदापूर विधानसभेच्या जागेचा निर्णय करा, मगच आम्ही आघाडीच्या उमेदवाराचे काम करु असं मत त्यांनी मांडलं होतं. या भूमिकेवर राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार, याकडे इंदापूरसह अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता इंदापूर विधानसभेचा प्रश्न आला कुठे? असा सवाल त्यांनीच उपस्थित केला. आम्ही लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय. आधी लोकसभा जिंकायचीय आणि नंतर विधानसभेबाबत चर्चा करु अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा तिढा वाढणार असल्याची शक्यता आहे.