Abhijit Patil : माझी लढायची तयारी कोठूनही आहे. मी माढ्यात (Madha) आताही येणार आणि परत सहा महिन्यानेही येणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी केलं आहे. एका कार्यक्रमानिमित्त ते माढा तालुक्यातील उंदरगावात आले होते. यावेळी त्यांना काही कार्यकर्त्यांनी माढा विधानसभा निवडणूक (Madha Assembly Constituency) लढवावी अशी मागणी केली. यावेळी मी कोठूनही लढायला तयार असल्याचे पाटील म्हणाले. त्यामुळं अभिजीत पाटील हे माढा विधानसभेची निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. माढ्यात चांगल्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधा नाहीत. अनेक ठिकाणी चांगले रस्ते नाहीत मग विकास कुठे झाला असे म्हणत पाटील यांनी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) यांचे नाव न घेता टीका केली.
तुमच्या मनातील गोष्ट करण्यासाठी लवकरच येऊ
तुमच्या मनातील गोष्ट करण्यासाठी लवकरच येऊ असे म्हणत माढा विधानसभा लढवण्याचे संकेत अभिज पाटलांनी दिले आहेत. दरम्यान, तुम्ही घाबरु नका तुम्हाला उसाला कोणाच्याही दारात जाऊ देणार नाही. तुमचा सगळा ऊस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला नेला जाईल असे पाटील म्हणाले. विठ्ठल कारखान्यावर 600 कोटी रुपयांचं कर्ज असतानाही मी चांगला दर दिला. मग जे कारखाने नफ्यात आहेत, त्यांना दर द्यायला काय अडचण? असे सवालही पाटील यांनी केले.
तुम्हाला उजनी धरणाचं पाणी कोणी दिलं?
अनेकजण सांगतात की उजनी धरणाचे पाणी सीना नदीला माझ्यामुळं आलं. पण त्यांना पाणी कोणी दिलं? त्या पाण्याचा उगम कोठून झाला असं म्हणत अभिजीत पाटील यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना टोला लगावला. उजनी धरणाच्या कामात आजही शरद पवार यांचेच नाव घेतले जाते. युतीच्या काळात या कामाला मंजुरी मिळाली होती. उजनी धरणाच्या कामाची कुदळ यशवंतराव चव्हाण यांनी मारली होती. त्यांना विसरणे चुकीचं असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले.
मी ट्रॅक्टरला उट्या लावून पुढे आलोय
साखर कारखाना कधीपर्यंत चालतो हे देखील काही लोकांना माहीत नाही. ते लोक अपघाताने राजकारणात पुढे आले आहेत. आम्ही ट्रॅक्टरला उट्या लावून पुढे आलो आहोत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांनी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. मागील वर्षी काही लोक म्हणाले अभिजीत पाटील चेअरमन असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना मार्च महिन्यापर्यंत चालत नाही. पण विठ्ठल कारखाना मार्चपर्यंत सुरु राहिल्याचे पाटील म्हणाले. 2007 साली ज्या साखर कारखान्याला माझी एक टोळी होती, आज मी त्याच साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे पाटील म्हणाले.
पाच वर्षात मी पाच कारखाने उभा केले, त्यामुळं आडवे अनेकजण येणार
आज मी सहा साखर कारखाने चालवत आहे. एवढे साखर कारखाने चालवत आहे म्हणल्यावर आडवे अनेकजण येणार असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. पाच वर्षात मी पाच कारखाने उभा केले आहेत. त्यामुळं अनेकजण आडवे येणार आहेत. माझ्यामागे Ed लावली, पण उद्योग मोठा आहे, त्यामुळं मी देखील हिशोब ठेवल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. मी चुकीचं काही केलं नाही तर त्यामुळं घाबरायचे कारण नसल्याचे पाटील म्हणाले.
6 वेळा शरद पवारांनी संधी देऊनही तुम्ही त्यांची साथ सोडली
अलिकडच्या काळात निष्ठा राहिली नाही. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवार यांचा देखील पक्ष फोडला. शरद पवार यांना बाप म्हणणाऱ्या लोकांनीच त्यांची साथ सोडली असं म्हणत अभिजीत पाटलांनी अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली. 6 वेळा तुम्हाला आमदारकीची संधी दिली तरी तुम्ही पवारांची साथ सोडली, हे दुर्दैवी असल्याचे म्हणत अभिजीत पाटील यांनी आमदार बबनदादा शिंदे यांंना टोला लगावला. मी अनेकांचं गणित बिघडवलंय. त्यामुळं अनेकजण गरळ बाहेर काढत आहेत. मी अनेकांचा खिसा कमी केलाय. याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. येणाऱ्या काळात आपण संघर्ष करु, शरद पवारांच्या पाठिशी उभं राहू असे अभिजीत पाटील म्हणाले.