Virat Kohli: IPL 2024: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. या सामन्यादरम्यान एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने सामन्यादरम्यान आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर दोघंही स्मितहास्य देत निघून गेले. यावेळीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कोहली आणि फाफ डू प्लेसिस आरसीबीसाठी सलामीला आले. दीपक चहर सीएसकेसाठी षटक टाकत होता. या खेळीदरम्यान कोहली धावा काढण्यासाठी धावला. चहर चेंडूकडे पाहत कोहलीला थांबताना दिसला. मात्र, कोहलीने हसून हे प्रकरण मिटवले आणि चहरही निघून गेला. कोहलीने आक्रमक खेळ केला असता तर प्रकरण आणखी बिघडू शकले असते. अशी अनेक दृश्ये आयपीएलमध्ये पाहायला मिळाली आहेत.
IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात RCB ने 6 विकेट्स गमावून 173 धावा केल्या. यादरम्यान कोहलीने 20 चेंडूंचा सामना करत 21 धावा केल्या. त्याने षटकार मारला. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकांत लक्ष्य गाठले. सीएसकेसाठी रचिन रवींद्रने चमकदार कामगिरी केली. त्याने 15 चेंडूत 37 धावा केल्या. शिवम दुबेने 34 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने नाबाद 25 धावा केल्या.
एमएस धोनीच्या बालेकिल्ल्यात 'कोहली-कोहली'चे नारे
विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल 2024चा पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात झाला. हा सामना चेन्नईतील चिंदबरम (चेपॉक) मैदानावर आयोजित करण्यात आला होता. चेपॉक मैदान धोनीचा बालेकिल्ला मानला जातो. चाहत्यांनी या मैदानात कोहली-कोहली असे नारे दिले. यावेळी कोहलीने देखील चाहत्यांना हात दाखवत आभार मानल्याचे या व्हिडिमध्ये दिसून येत आहे.
आरसीबीचा दुसरा सामना पंजाब किंग्सविरुद्ध-
आरसीबीचा पुढचा सामना पंजाब किंग्ससोबत आहे. हा सामना 25 मार्च रोजी बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळत आरसीबी आयपीएलच्या या हंगामात खातं उघडणार का?, हे स्पष्ट होईल.