Punjab Election 2022 : सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अशातच पंजाबमध्येही राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषीत करण्यात आले आहे. मात्र, यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांचा गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. सिद्धू हे देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. कारण सिद्धू यांनी याबाबत एक वक्तव्य केले आहे. जर 60 आमदार निवडून आले नाहीत तर मुख्यमंत्री कसा होणार? असा सवाल सिद्धू यांनी केला आहे.
चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर नवज्योत सिंह सिद्धू खूश नसल्याचे दिसत आहे. तुम्हाला 60 आमदार मिळतील की नाही हे पंजाबची जनता ठरवेल, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. 60 आमदार जिंकून आले नाहीत तर मुख्यमंत्री कसा होणार? असा सवाल सिद्धू यांनी उपस्थित केला आहे. एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की राजकारणात काहीही ठरवले जात नाही असेही ते म्हणाले. सिद्धू यांनी यापूर्वी हायकमांडच्या निर्णयावर ठाम असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सिद्धू नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विद्यामान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. या पदासाठी चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू या दोघांमध्ये चुरस असल्याचे पाहायला मिळाले होते. पण अखेर चन्नी यांच्या नावाची हायकमांडने घोषणा केल्याने सिद्धू गट नाराज झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याची घोषणा केल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांड नाही तर पंजाबची जनता घेतील, असा दावा सिद्धू यांनी केला होता. सिद्धू यांच्या या विधानावरुन विरोधीक त्यांच्यावर टीका करत आहेत.
दरम्यान, पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेसची लढत ही प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि अकाली दल- बीएसपीच्या युतीशी होणार आहे. या निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्ष बहुमताजवळ जाण्याची शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाशी युती केली आहे. एबीपी माझाच्या सी वोटर सर्व्हेमध्ये वरील अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व्हेनुसार या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसला 117 जागांपैकी 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 55 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अकली दल महायुतीला 20 आणि 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला तीन ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: