Sangli News : स्वत: च्या आजारपणाला कंटाळलेल्या मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी जन्मदात्या आईची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मृत्यूच्या पश्चात वृद्ध आईचा सांभाळ कोण करणार या चिंतेतून त्याने हत्या केली असल्याचे समोर आले आहे. सांगलीतील आष्टामध्ये ही मन सुन्न करणारी ही घटनासमोर आली आहे. रतन रामचंद्र कांबळे (वय ८०) आणि शशिकांत रामचंद्र कांबळे (वय ४७) असे या दुर्दैवी मायलेकाचे नाव आहे.
आष्टामध्ये शशिकांत कांबळे हे वृद्ध आई रतन तसेच पत्नी सुनीता व दोन मुलांसह अनेक वर्षापासून वास्तव्यास होते. शशिकांत याचे वडील रामचंद्र कांबळे व आई रतन कांबळे दोघेही प्राथमिक शिक्षक होते. शशिकांत कांबळे यांच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. तर भाऊ, वहिनी व बहिणीचेही निधन झाले आहे. शशिकांत यांचे आष्ट्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर कापड दुकान आहे. मंगळवारी त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. दिवसभर घरी शशिकांत व त्यांची आई रतन हे दोघेच होते. शशिकांत यांना दम्याचा आजार आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासुन ते तणावाखाली होते. या नैराश्यातूनच त्यांनी कॉटवर विश्रांती घेत असलेल्या आईची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. यानंतर घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान पत्नी सुनिता यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. वारंवार प्रयत्न करुनही शशिकांत यांच्याशी संपर्क न झाल्याने सायंकाळी सुनिता घरी आल्या असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
शशिकांत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थळी मिळाली. यामध्ये ‘माझ्या स्वतःच्या आजारपणाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. आईला सांभाळण्यास कोणी नसल्याने मी आईला माझ्यासोबत घेऊन जात आहे.’असे लिहिले. या घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले. पोलीस निरीक्षक अजित सिद, सहाय्यक निरीक्षक रावसाहेब बाबर, सहाय्यक उपनिरीक्षक दीपक सदामते व पथकाने पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. घटनास्थळी नागरिकांची माेठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.