गोवा : काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येणार नाही याची खात्री असल्यानेच बाबुश मोन्सेरात भाजपचे तिकीट मागण्यासाठी भाजपच्या ऑफिसमध्ये आले होते. आम्ही उमेदवारी नाकारल्याने पराभूत होण्यासाठी मोन्सेरात काँग्रेसमध्ये गेले, असा सनसनाटी गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी आज केला.


स्मार्ट सिटीच्या संदर्भात काँग्रेसकडून केले जात असलेले सगळे आरोप निराधार असून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत आज भाजपच्या वतीने काँग्रेसचा निषेध करण्यात आला.

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष असलेल्या बाबुश मोन्सेरात यांनी पणजीची पोटनिवडणुक जाहीर होताच गोवा फॉरवर्ड आणि ग्रेटर पणजी पीडीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर त्यांनी पणजीची निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे सांगून काँग्रेसकडून समर्थनाची मागणी केली होती.

दरम्यानच्या काळात घडलेल्या राजकीय घटनांमुळे मोन्सेरात यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पणजीची निवडणूक काँग्रेसतर्फे लढवण्याचा निर्णय घेतला. भाजप विरोधातील मते विभागली जाऊ नये यासाठी त्यांनी काही पक्षांशी संधान साधल्याची चर्चा होती. मात्र त्यापूर्वी ते भाजपच्या संपर्कात आले होते की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. तेंडुलकर यांच्या गौप्यस्फोटामुळे आज ही बाब उघड झाली आहे.

भाजप मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्याचे खासदार नरेद्र सावईकर यांनी स्मार्ट सिटी संदर्भात काँग्रेसने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. ज्या कामांसंदर्भात आरोप केले जात आहेत त्याचे टेंडर देखील निघालेले नसल्याने काँग्रेसचे आरोप निराधार असल्याचे सावईकर म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी 23 मे रोजी 2 लोकसभा आणि 4 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजप विजयी होणार असा दावा केला. 23 मे नंतर आपले सरकार येणार अशी दिवा स्वप्ने काँग्रेसने पाहू नयेत असा सल्ला काँग्रेसला दिला.

पणजीची पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा काँग्रेसचे उमेदवार असलेले बाबूश मोन्सेरात हे पणजीचे तिकीट मागण्यासाठी भाजपच्या ऑफिसमध्ये आले होते. मात्र आम्ही त्यांना नकार दिला. त्यानंतर पराभूत होण्यासाठी त्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला असा गौप्यस्फोट तेंडुलकर यांनी केला.