Nashik Municipal Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज (दि. 15) सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहरातील काही मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागली.

Continues below advertisement

नाशिक महापालिकेच्या एकूण 122 जागांसाठी आज मतदान होत असून, यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. कालच मतदान यंत्रे आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले होते. निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या सुरुवातीलाच ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला.

Nashik Municipal Election 2026: प्रभाग 29 मध्ये अर्धा तास मतदान ठप्प

नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मधील एका मतदान केंद्रात खोली क्रमांक दोनमध्ये असलेले ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. तब्बल अर्धा तास मशीन सुरू न झाल्याने मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. सकाळी लवकर मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्रावरच ताटकळत थांबावे लागले. यामुळे काही काळ नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दूर केला आणि मशीन पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर मतदारांनी मतदानास सुरुवात झाली.

Continues below advertisement

Nashik Municipal Election 2026: प्रभाग 24 मध्येही मतदानास उशीर

दरम्यान, नाशिकमधील प्रभाग क्रमांक 24 मधील मॉडर्न हायस्कूल, खोली क्रमांक 8 येथेही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदान केंद्रावर सकाळी बराच वेळ मतदान सुरू होऊ शकले नाही. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब लागला. तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून संबंधित मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 

Nashik Municipal Election 2026: 13 लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

नाशिक महापालिकेसाठी एकूण 13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 6 लाख 56 हजार 675 महिला, तर 7 लाख 3 हजार 968 पुरुष मतदार आहेत. शहरात एकूण 1,563 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. त्याचा नेमका परिणाम काय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सकाळच्या तासांत ईव्हीएम बिघाडाच्या घटनांमुळे काही ठिकाणी मतदान रखडले असले, तरी उर्वरित मतदान केंद्रांवर शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा 

BMC Election 2026 Dubar Voter In Mumbai: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?