Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Mahanagarpalika Election 2026) पार्श्वभूमीवर भाजपमधील (BJP) अंतर्गत असंतोष उघडपणे समोर येत आहे. नाशिकरोड येथील भाजप कार्यालयात गुरुवारी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राडा सुरू असतानाच, पंचवटीतील (Panchavati) प्रभाग क्रमांक एकमधून आणखी एक मोठी बंडखोरी समोर आली आहे. 

Continues below advertisement

भाजप शहर सरचिटणीस आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अमित घुगे (Amit Ghuge) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, घुगे यांनी भाजप शहर सरचिटणीसपदाचा राजीनामा देत पक्षनेतृत्वाविरोधात उघड बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे भाजपच्या गडातच बंडखोरी तीव्र झाल्याचे चित्र आहे.

Amit Ghuge: उमेदवारी नाकारल्याने नाराजी

नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक एकमधून अमित घुगे यांनी भाजपकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. “उमेदवारी प्रक्रियेत मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या प्रवृत्तीविरोधात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे,” असे स्पष्ट करत घुगे यांनी पक्षाच्या धोरणांवर आणि स्थानिक नेतृत्वावर थेट टीका केली.

Continues below advertisement

Amit Ghuge: निष्ठावंतांवर अन्यायाचा आरोप

पत्रकार परिषदेत घुगे यांनी तिकीट वाटपातील गोंधळ, कथित सर्वेक्षण फेरफार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाबाबत सविस्तर भूमिका मांडली. “गेली वीस वर्षे मी भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केले. युवक मोर्चापासून ते शहर सरचिटणीसपदापर्यंत प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली. तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला. आपण भावनेच्या भरात नव्हे, तर अन्यायाविरोधात भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी निवडणूक आधीच उभी केली असून प्रचारालाही सुरुवात केली आहे,” असे त्यांनी सांगितले.

Amit Ghuge: आर्थिक अडचण नाही, कार्यकर्त्यांचा पाठिंबा

“भाजप मला आईसमान आहे,” असे सांगतानाच, अपक्ष निवडणूक लढवताना आर्थिक अडचण येणार नसल्याचेही घुगे यांनी स्पष्ट केले. “माझी स्वतःची आर्थिक क्षमता आहे. शिवाय अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी खर्च उचलण्यास तयार आहेत,” असे ते म्हणाले. मागील निवडणुकीत तसेच यावेळीही आपण सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करत, “हा सर्वे बदलण्यात आल्याचा मला संशय आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

Amit Ghuge: ‘मोदींचा फोन आला तरी माघार नाही’

घुगे यांनी शहराध्यक्ष आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या आमदारांवरही गंभीर आरोप केले. “मी शहराध्यक्ष आणि संबंधित आमदारांना तब्बल पंधरा वेळा फोन केला, मात्र एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रक्रियेशी मंत्री गिरीश महाजन यांचा थेट संबंध नाही, पण शहराध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी माझा विश्वासघात केला आहे,” असा आरोप त्यांनी केला. याचवेळी, “आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोन आला तरी मी उमेदवारी मागे घेणार नाही,” असा ठाम दावा करत त्यांनी माघार न घेण्याची भूमिका स्पष्ट केली.

Nashik BJP: भाजपची चिंता वाढली

नाशिकरोडपासून पंचवटीपर्यंत सुरू झालेल्या बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून, अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्यास निवडणूक समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. आता पक्ष नेतृत्व या बंडखोरीवर कसा तोडगा काढते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Mahanagarpalika Election 2026: बंडोबांना थंड करण्यासाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून, सुधाकर बडगुजर-मुकेश शहाणे वादावर तोडगा काढणार?