चंद्रपूर : भारतीय जनता पक्ष सध्या ज्येष्ठ नेत्यांचा अवमान करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे गुरु लालकृष्ण अडवाणी यांना डावललं असल्याचा आरोप कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आज चंद्रपूरमध्ये राहुल गांधी यांची प्रचार सभा झाली. या सभेत राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला.


राहुल गांधी म्हणाले की, हिंदू धर्मात गुरुला खूप मोठे स्थान आहे. परंतु नरेंद्र मोदींनी स्वतःच्याच गुरुला डावललं आहे. तेच नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष आम्हाला हिंदू धर्माबद्दल शिकवू पाहतोय.

आगामी निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेचे तिकीट नाकारले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने इंदौरमधून अद्याप उमेदवारी जाहीर नसल्यामुळे महाजन दुखावल्या आहेत. पक्षाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुमित्रा महाजनांनी आपली नाराजी उघड केली आहे.

महाजन यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा फैसला केला आहे. भाजपच्या या दिग्गज नेत्याने काही दिवसांपूर्वी कानपूर मधील मतदारांना एक हस्ताक्षर नसलेल्या पत्राद्वारे सांगितले की, पक्षानेच त्यांना निवडणूक न लढण्यास सांगितले आहे