नवी दिल्ली : आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. यावेळी मोदी यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी लोकसभा निवडणूक, निवडणुकीचा निकाल, ईव्हीएम यावर भाष्य केलं. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे जाणून घेऊ या...


1) निवडणुकीच्या काळात भारताला विभाजित करण्याचा प्रयत्न


निवडणुकीच्या काळात हिंसा भडकावण्याचा प्रयत्न करण्यात केला. देशात लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणुकीच्या काळात लोकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो पण त्यांनी लोकांना विभाजित केलं. यावेळच्या निवडणुकीत एनडीएचा महाविजय झाला आहे. निकालानंतर एनडीएचा पराभव झाला आहे, असं चित्र निर्माण करण्यात आलं. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून विरोधकांना तसं चित्र निर्माण करावं लागलं.






2) भारतात लोकशाही नाही, असे विरोधक जगभरात सांगतात




इंडिया आघाडी तंत्रज्ञान, विकासाच्या विरोधात आहे. मी जगात सांगतो की आम्ही जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहोत. पण हे जगात जाऊन सांगतात की भारतात लोकशाही नाही. या निकालामुळे भारताची विशालता, व्यापकता जाणून घेण्यासाठी जग आकर्षित होणार आहे.


3) निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न


2019 साली ते पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनला घेऊन टीका करायाला सुरुवात करतील. निवडणुकीच्या काळात प्रत्येक तीन दिवसांनी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा कसा आणता येईल, यासाठी प्रयत्न केले.


4) विरोधकांनी देशाला बदनाम करण्याचा कट रचला 


निवडणूक आयोगावर आरोप करायचा, निकाल काहीही लागूदेत भारताची जगात बदनामी करायची, असा विरोधकांनी कट रचला होता. देश त्यांना कधीही माफ करणार नाही. 






5) नरेंद्र मोदींची विरोधकांवर बोचरी टीका




आपलं विकसित भारताचं स्वप्न आहे. येणाऱ्या 25 वर्षांत महाप्रभू जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने ओदिशा या राज्याचे देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असेल. चार जून रोजी निकाल लागला. मी माझ्या कामात व्यग्र होतो. पण मी एका माझ्या सहकाऱ्याला विचारलं की देशात ईव्हीएम जिंवत आहे का, की ईव्हीएम मरून गेले आहे.


6) विरोधक ईव्हीएमवर टीका करायचे, आता ते गप्प झाले


भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडावा यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला. विरोधक ईव्हीएम मशीवर टीका करायचे. पण 4 जून रोजी संध्याकाळपर्यंत ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाची ताकद आहे. 


7) नरेंद्र मोदींनी घेतलं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 


एडीए आघाडी ही राष्ट्रप्रथम या भावनेतून तयार झालेली आहे. भारताच्या राजकीय पटलावर ही एक ऑरगॅनिक युती आहे. आज अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव या अनेकांची मी नावं घेऊ शकतो. त्यांनी जे बीज रुजवलं होतं, त्या बिजाला पाणी घालून जनतेने त्या बिजाचा वटवृक्ष केलं आहे.गेल्या दहा वर्षांत एनडीच्या जुन्याच मूल्यांना घेऊन पुढे जाण्याचा, देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.


8) एनडीएची यात्रा तीन दशकांची, तीन वेळा कार्यकाळ पूर्ण केला


आपला देश विविधतेने भरलेला आहे. पण एनडीएची यात्रा ही तीन दशकांची आहे. म्हणूनच मी मोठ्या गर्वाने सांगतो की संघटनेत मी एक कार्यकर्ता म्हणून एनडीए आघाडीचा भाग होतो. मी आज संसदेत बसून तुमच्यासोबत काम करतोय. मी सांगू शकतो की एनडीए आघाडी ही सर्वांत यशस्वी युती आहे. प्रत्येक सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ असतो. या एनडीए आघाडीने 30 वर्षांत पाच-पाच वर्षांचा कार्यकाळ तीन वेळा पूर्ण केलेला आहे. आता आपण चौथ्या कार्यकाळात प्रवेश करत आहोत.


9) एनडीए युती देशाचा खरा आत्मा


तुम्ही माझी पुन्हा एकदा नेता म्हणून निवड केली आहे. म्हणजेच तुमच्यात आणि माझ्यात विश्वासाचं नातं आहे. आपल्यातील नातं हे विश्वासावर टिकून आहे. भारतासारख्या महान देशाची ताकत पाहा. आज एनडीएचे देशातील 22 राज्यांत सरकार आहे. लोकांनी या 22 राज्यांत एनडीएला सेवा करण्याची संधी दिली. आपली ही एनडीए युती देशाचा खरा आत्मा आहे. आपली युती ही भारताचे प्रतिबिंब आहे. 


10) दक्षिण भारतात एनडीएने चांगली कामगिरी केली


दक्षिण भारतात एनडीएने नव्या राजकारणाचा प्रारंभ केला आहे. तेलंगणाचे उदाहरण घेऊ. आता कुठे त्यांचं तेलंगणात सरकार आलं होतं. आता लगेच तेथील लोकांनी एनडीएवर विश्वास ठेवला आहे. मी तमिळनाडूच्या एनडीए युतीचं अभिनंदन करू इच्छितो. तमिळनाडूत एनडीएतील अनेक पक्ष असे होते, ज्यांचे तेथे उमेदवार नव्हते. पण त्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. आपले तेथे मतदानाचा टक्का वाढला आहे. केरळचे उदाहरण घ्या. तेथे एनडीएच्या कार्यकर्त्यांवर अनेक अत्याचार झालेले आहेत. समोर विजय दिसत नसतानाही तेथे कार्यकर्ते लढत होते. पण आज कित्येक वर्षांनी पहिल्यांदा आपला उमेदवार तेथून निवडून आला आहे. अरुणाचल प्रदेशात आपले सरकार अनेकवेळा आलेले आहे. आंध्र प्रदेशमध्येही एनडीएचे सरकार आलेले आहे.