माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातोय, पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलावं लागतं, नारायण राणेंची खंत
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2019 10:34 PM (IST)
आज नारायण राणेचं जे कौतुक केलं ते माझं नाही तर बाळासाहेबांचं कौतुक आहे. बाळासाहेब माझं भाषण ऐकून सांगायचे तो किती फास्ट बोलतो, हळू बोल. साहेबांनी आम्हाला असं घडवलं. तो काळ पुस्तकात गाळला आहे, असं राणे म्हणाले.
MUMBAI, INDIA - OCTOBER 7: Congress leader Narayan Rane during an election rally in Kankavli Assembly constituency on October 7, 2014 in Mumbai, India. Maharashtra Legislative Assembly election will be held on October 15, 2014, in a single phase, to elect the 288 members to the state assembly. (Photo by Satish Bate/Hindustan Times via Getty Images)
मुंबई : आमदार झालो तेव्हा मंत्री व्हायचं होतं. मंत्री झालो तेव्हा मुख्यमंत्री बनायचं होतं. ते झालो. आता खासदार झालो पण माझ्या मर्जीने झालो नाही. माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातोय. पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलावं लागतं आहे, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी खंत व्यक्त केली आहे. राणे यांच्या 'नो होल्डस् बार्ड' या इंग्रजीतील आणि झंझावात या मराठीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले की, 370 कलम ज्या दिवशी होतं, त्या दिवशी गडकरी व्यस्त होते. मी जेव्हा सांगितलं की पुस्तक प्रकाशन आहे. त्यांनी तात्काळ वेळ दिली. आपल्या मित्राला आनंद होईल असं वागले. मंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार एका फोन वर आले. तटकरे फोन न करता आले. मुख्यमंत्र्यांकडे पुस्तक प्रकाशनासाठी वेळ मागितला पण दिला नाही, असे ते म्हणाले. राणे म्हणाले की, मी पुस्तक लिहिताना सावधगिरी बाळगली आहे, काही गोष्टी टाळल्या आहेत. शिवसेनेत आता काही नाही आता सगळं संपलं आहे. आम्ही पक्ष वाढवायला, वाचवायला काम केलं. आता शिवसैनिक ते करू शकणार नाहीत. आता शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत. आम्हाला तर त्यावेळी वडापावही मिळायचा नाही, असेही राणे म्हणाले. आज नारायण राणेचं जे कौतुक केलं ते माझं नाही तर बाळासाहेबांचं कौतुक आहे. बाळासाहेब माझं भाषण ऐकून सांगायचे तो किती फास्ट बोलतो, हळू बोल. साहेबांनी आम्हाला असं घडवलं. तो काळ पुस्तकात गाळला आहे, असं राणे म्हणाले. मी साहेबांना 6 पानी पत्र लिहिलं मी शिवसेना सोडतो आहे. दुसऱ्या दिवशी साहेबांनी फोन केला. नारायण रागावला का, एकदा ये. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले राणे परत आले तर मी घर सोडीन. साहेब हे साहेब होते, प्रेम फक्त साहेबांवर केलं, असेही राणे यावेळी म्हणाले.