Nagaland Election 2023 Candidates Final List: नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Election 2023) पक्षांकडून कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार, याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. नागालँडमध्ये (Nagaland News) 59 जागांसाठी एकूण 183 उमेदवार रिंगणात उतरले असून केवळ चार महिला उमेदवार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) व्ही शशांक शेखर यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.


उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेखर म्हणाले, "एका जागेवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार काझेटो किनीमी यांनी झुन्हेबोटो जिल्ह्यातील अकुलुटो विधानसभा जागा न लढवता जिंकली आहे. किनीमी यांच्या विरोधात दुसरा उमेदवार नसल्यानं त्या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे."


25 अर्ज अवैध 


त्यांनी सांगितलं की, "225 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 25 अवैध ठरले आहेत, तर 16 उमेदवारांनी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. सत्ताधारी एनडीपीपी 40, भाजप 20, काँग्रेस 23 तर एनपीएफ 22 जागांवर निवडणूक लढवत आहे. 15 जागांवर लोक जनशक्ती (लोजप-रामविलास), एनपीपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 12 जागांवर आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) नऊ जागांवर, जनता दल (युनायटेड) सात जागांवर, राष्ट्रीय जनता दल तीन आणि सीपीआय आणि रायझिंग द पीपल्स पार्टी प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवत आहे.


मतदान कधी? 


नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदार मतदान करणार आहेत. तर, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी होती, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 10 फेब्रुवारी होती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, नागालँडमधील विधानसभेचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपणार आहे.


नागालँडचं राजकीय समीकरण


नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार आहे आणि नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर एनडीपीपीनं 18 तर भाजपनं 12 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती केली होती. एनडीपीपी, भाजप, एनपीपी यांचा सरकारमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षीच एनडीपीपी आणि भाजपनं संयुक्त पत्रकार परिषदेत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. एनडीपीपी 40 जागा आणि भाजप 20 जागांवर एकत्र लढणार असल्याचं दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात म्हटलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Meghalaya Election 2023: मेघालयमध्ये 60 जागांच्या बहुरंगी लढतीत 375 उमेदवारांचं भवितव्य पणाला; कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?