बंगळुरु : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ भाजप नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा म्हणाले की, "मुस्लिम लोक आमच्यावर (भाजपवर) विश्वास ठेवत नाही, त्यामुळे आम्ही मुस्लिम उमेदवारांना तिकीट देत नाही. तुम्ही (मुस्लीम सामुदाय) आमच्यावर विश्वास ठेवा, तर मग आम्ही तुम्हाला तिकीट देतो." या विधानामुळे ईश्वरप्पा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु झाली आहे.


काल (सोमवार, 1 एप्रिल) कोप्पल येथे झालेल्या प्राचाराच्या एका कार्यक्रमात ईश्वरप्पा यांनी अल्पसंख्यांक सामुदायातील लोकांशी संवाद साधला. त्यावेळी ईश्वरप्पा म्हणाले की, "काँग्रेसने तुमचा (मुस्लीम सामुदायाचा) फक्त वोट बँक म्हणून वापर केला आहे. तसेच काँग्रेसने तुम्हाला लोकसभेचे तिकीटसुद्धा दिले नाही. आम्ही मुस्लिमांना तिकीट देत नाही. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, मग आम्ही तुम्हाला तिकीट देऊ."

ईश्वरप्पा हे कर्नाटकमधील जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारमध्ये 2012 ते 2013 दरम्यान उपमुख्यमंत्री होते. ईश्वरप्पा यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका कार्यक्रमात ईश्वरप्पा म्हणाले होते की, "जे मुस्लीम काँग्रेसमध्ये आहेत, ते 'हत्यारे' आहेत. जे मुस्लीम भारतीय जनता पक्षासोबत आहेत, ते चांगले मुस्लीम आहेत."