मुस्लीम लीग हा व्हायरस आहे, त्यामुळेच देशाची फाळणी झाली : योगी आदित्यनाथ
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2019 05:22 PM (IST)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यं करणे सुरुच ठेवले आहे. आदित्यनाथ यांनी आता मुस्लीम लीगच्या आडून काँग्रेसवर टीका केली आहे.
VARANASI, INDIA - APRIL 2: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath speaks during BJP' New voter youth conference, at Saroja Palace, Sant Kabir Road on April 2, 2019 in Varanasi, India. (Photo by Rajesh Kumar/Hindustan Times via Getty Images)
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यं करणे सुरुच ठेवले आहे. आदित्यनाथ यांनी आता मुस्लीम लीगच्या आडून काँग्रेसवर टीका केली आहे. आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीगला व्हायरस संबोधले आहे. 'या व्हायरसने काँग्रेस संक्रमित झाली आहे', असे म्हणत आदित्यनाथांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आदित्यनाथ यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुस्लीम लीग एक व्हायरस आहे. हा असा व्हायरस आहे, ज्यापासून कोणीही वाचू शकलेला नाही. आज मुख्य विरोधी पक्ष असलेला कांग्रेस या व्हायरसने संक्रमित झाला आहे. विचार करा जर काँग्रेस पक्ष या निवडणुकीत जिंकला तर काय होईल? ते जिंकले तर हा व्हायरस संपूर्ण देशभर पसरेल. योगींनी त्यानंतर अजून एक ट्वीट करुन म्हटले आहे की, "1857 च्या स्वातंत्र्य संग्रामावेळी संपूर्ण देश क्रांतीकारक मंगल पांडे यांच्यासोबत इंग्रजांविरोधात उभा ठाकला होता. त्यानंतर हा मुस्लीम लीग नावाचा व्हायरस आला आणि संपूर्ण देशभर पसरला. या व्हायरसमुळे देशाची फाळणी झाली. आज पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा हिरवे झेंडे फडकू लागले आहेत. काँग्रेस पक्ष या व्हायरसने संक्रमित झाला आहे. सावधान राहा!"