कोल्हापूर: ब्लडप्रेशर 195 वर गेला, पक्ष फुटला तरी एकनिष्ठ राहिलो आता राजू शेट्टींना (Raju Shetti) जवळ करु नका असं आवाहन कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केलं आहे. राजू शेट्टी हे या आधीही शिवसेनेच्या मदतीने खासदार झाले, पण नंतर त्यांनी आपल्याशी गद्दारी केली, त्यामुळे ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत असं मुरलीधर जाधव म्हणाले. हातकणंगल्याचे (Hatkanangale Lok Sabha Constituency) माजी खासदार राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून इच्छूक असलेल्या मुरलीधर जाधवांनी आपला रोष व्यक्त केला.
काय म्हणाले मुरलीधर जाधव?
मातोश्रीमधून राजू शेट्टी बाहेर पडल्यानंतर त्यांनी असं एक वाक्य वापरलं की आदानी उद्योग समूहाचे जे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत त्याच्या विरोधात जन आंदोलन मी उभं करणार आहे. त्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी मी उद्धव साहेबांच्याकडे गेलो. परंतु राजू शेट्टी हा माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. 2014 ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचं डिझेल घालून निवडून आणलं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि हेच राजू शेट्टी भाजपच्या गोटात जाऊन बसले. म्हणजे त्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली.
उद्धव साहेबांना माझी विनंती आहे की, पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाहिजे. 2005 ला पक्ष फुटला त्यावेळीसुद्धा आम्ही पक्षासोबत राहिलो. गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी सुद्धा आम्ही साहेब तुमच्यासोबत राहिलो. जयसिंगपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महामोर्चे काढले.
राजू शेट्टी आयत्या बिळात नागोबा
आज माझं ब्लडप्रेशर 195 झालं, साहेब मला दवाखान्यांमध्ये अॅडमिट केलं. अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल. माझ्यासारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पण संधी द्यावी.
राजू शेट्टी हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, तो शिवसेनेची मदत घेऊन निवडणूक जिंकतो आणि नंतर कोणत्याही निवडणुकीला आपल्याला मदत करत नाही. विधानसभा असो, जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायत असो, राजू शेट्टी कोणत्याही शिवसैनिकाला मदत करणार नाही, एक रुपयाचा फंडही देणार नाही.
हातकणंगले मतदारसंघात आजी आणि माजी खासदारांवर लोक नाराज आहेत. राजू शेट्टींचे उसाचं आंदोलन एक स्टंट होतं. राजू शेट्टींनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना कुठे ठेवायचं हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे. मी उद्धव ठाकरेंना भेटणार असून त्याची भूमिका जाणून घेणार आहे. त्यानंतर मी माझं मत व्यक्त करेन.
ही बातमी वाचा:
VIDEO : Murlidhar Jadhav : Raju Shetti मातोश्रीवर, ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक नाराज,मुरलीधर जाधव काय म्हणाले?