Maharashtra Municipal Corporation Election: मुंबईसह राज्यातील मुदत संपलेल्या 27 आणि नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी मनपासाठी उद्यापासून (23 डिसेंबर) रणधुमाळी सुरु होत आहे. राज्यातील सर्व मनपांसाठी एकत्रित मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे, तर मतमोजणी दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी अवघ्या 23 दिवसांचा अवधी असताना अजूनही मनपा जागावाटपासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून घोडं अडल्याचं चित्र आहे. मनपा निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सर्वच मनपांमध्ये प्रशासकराज सुरु असल्याने संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे आता मनपा नव्या वर्षात आता कारभाऱ्यांनी भरून जाणार आहेत. 

Continues below advertisement

उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात

राज्यात सर्वच मनपांसाठी उद्यापासून (23 डिसेंबर) अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ऑफलाईन नामनिर्देशन स्वीकारली जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 23 ते 31 डिसेंबर असणार आहे. सर्व दाखल उमेदवार अर्जांची छाननी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस 1 जानेवारी 2026 आहे. चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदान 15 जानेवारी रोजी होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी असेल. 

जागावाटपावरून डोकेदुखी 

दरम्यान, मनपा निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीने सुद्धा कंबर कसली आहे. मुंबई महानगरसह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढतील असे चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अजित पवारांनी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांना फोन केल्याची चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा मनपा असून याठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेत युतीवरून अजूनही खणाखणी सुरु आहे.  नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत शिंदेंचा स्ट्राईक रेट तुलनेत सर्वाधिक राहिल्याने त्यांची जागावाटपात ताकद वाढली आहे. 

Continues below advertisement

ठाकरे बंधूंची यूती अंतिम टप्प्यात 

दरम्यान, मुंबई महानगरसह राज्यात जवळपास 10 मनपांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. दोन्ही पक्षांकडून उद्या (23 डिसेंबर) घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदा संजय राऊत यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. मराठीबहुल वार्डात दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ असल्याने राज ठाकरे यांनी संजय राऊत आणि अनिल परब यांना सबुरीचा सल्ला देत एक पाऊल मागे टाकलं आहे.  

नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय 

दरम्यान, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडीने मोठा विजय मिळवला.  288 जागांसाठी (246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती) युतीने 207 जागा जिंकल्या. भाजप 117 जागा जिंकून आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 53 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 37 जागा जिंकल्या. महाविकास आघाडी 44 जागांपर्यंत मर्यादित राहिली. काँग्रेसने 28 जागा जिंकल्या, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 7 जागा जिंकल्या आणि शिवसेनेने (यूबीटी) 9 जागा जिंकल्या. इतरांनी 32 जागा जिंकल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या