बीड : भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी शरद पवारांच्या (Sharad pawar) उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राजेंद्र मस्के यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राजेंद्र मस्के हे अनेक दिवस भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होते मात्र आता राजेंद्र मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून मुंडेंचा दबदबा असून दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा पंकजा मुंडेंकडून (Pankaja Munde) चालवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण बीड जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीवर भाष्य करणार आहोत. महाराष्ट्रात कायम संवेदनशील राजकारण राहिलेल्या बीड (Beed) जिल्ह्याची. मुंडे पंडित क्षीरसागर या कुटुंबाची राजकीय घराणेशाही राहिलेल्या या जिल्ह्यात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.


सरकार कोणत्याही पक्षाचं असो बीड जिल्ह्यात ठराविक राजकीय घराणेशाहीची मक्तेदारी राहिली आहे. राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न नेमका काय हेच आपण समजून घेऊयात. बीड जिल्हा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा राज्यातील सगळ्यात संवेदनशील जिल्हा आहे. राज्यात वाहणाऱ्या राजकीय वाऱ्याची चाहूल आधी या जिल्ह्याला लागते आणि उलथा पालथीला इथूनच सुरुवात होते. मागच्या साठ वर्षात बीड जिल्ह्यात एकूण 89 आमदार झाले, यात दहा महिला आमदारांचा समावेश आहे. मात्र, यातील सर्वाधिक 10 आमदार एकट्या मुंडे कुटुंबातून झाले आहेत. मातब्बर राजकीय घराण्याला शह देऊन स्वर्गीय विमल मुंदडा यांनीही राजकारणाची सुरुवात केली आणि त्याही तब्बल पाच वेळा केज विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. विमल मुंदडा यांच्यानंतर त्यांच्या सुनबाई नमिता 2019 ला विधानसभेला निवडून आल्या आणि आता पुन्हा 2024 ला त्या विधानसभेला भाजपकडून निवडणूक लढत आहेत. केजनतंर, गेवराईच्या पंडित कुटुंबात सात वेळा आमदारकी होती, या खालोखाल माजलगावच्या सोळंके कुटुंबात सुद्धा तब्बल पाचवेळा आमदार पद राहिले आहे, असे सामाजिक कार्यकर्ता रामनाथ खोड यांनी म्हटले.  


मुंडेंची घराणेशाही कायम वरचढ


बीड जिल्ह्यात मुंडे कुटुंबाची राजकीय घराणेशाही कायम वरचढ राहिली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच मुंडे कुटुंबात आमदार आणि खासदारकीला सुरुवात झाली, गोपीनाथ मुंडे हे चारवेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनीही दोन वेळा विधानसभेची आमदारकी मिळवली आणि आता त्या विधान परिषदेवर आमदार आहेत. पंकजा मुंडे नंतर धनंजय मुंडे यांनी सुद्धा विधान परिषदेचे आमदारकी त्यानंतर विधानसभेचे आमदार आणि आता 2024 ला विधानसभेचे आमदार म्हणून निवडणूक लढवत आहेत 


कोणत्या कुटुंबात किती वेळा आमदारकी 


गेवराईतील पवार कुटुंबाकडे चार वेळा आमदारकी 


गेवराईतील पंडित कुटुंबाकडे तब्बल सात वेळा आमदारकी


माजलगावमध्ये सोळंके कुटुंबाकडे पाच वेळा आमदारकी


बीडमधील क्षीरसागर कुटुंबाकडे सहा वेळा आमदारकी


आष्टीमधील धोंडे कुटुंबाकडे चार वेळा आमदारकी


आष्टीमधील आजबे कुटुंबाकडे तीन वेळा आमदारकी..


केज मधील मुंदडा कुटुंबाकडे सहावेळा आमदारकी 


परळीतील मुंडे कुटुंबाकडे आठ वेळा आमदारकी


बीड जिल्ह्यात या राजकीय घराणेशाहीची राजकीय पकड असली तरी अधून मधून आलेल्या राजकीय नेत्यांनी स्वतःचा चांगला जम राजकारणात बसवला होता. त्यात सर्वाधिक जास्त काळ विनायक मेटे यांनी पाच वेळा विधानपरिषदेची आमदारकी मिळवून आपला वेगळा ठसा उमटवला होता. यंदा होऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच घराण्यातील राजकीय उमेदवारांची उमेदवारी आपल्याला पाहायला मिळत आहे.