Mumbra-Kalwa Assembly Election 2024 : मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी गड कायम राखला आहे.  मुंब्रा-कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड विद्यमान आमदार असून त्यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली. मुंब्रा-कळवा मतदारसंघात शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जितेंद्र आव्हाड यांनी सलग तीन टर्ममध्ये एकहाती सत्ता कायम राखली असताना यंदाच्या निवडणुकीत त्यांना हा गड कायम राखण्याचं आव्हान होतं. हे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पार पेललं आणि सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत.


मुंब्रा-कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी


2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नजीब मुल्ला यांचा पराभव केला. जितेंद्र आव्हाड यांना यंदाच्या निवडणुकीत 157141 मते मिळाली. जितेंद्र आव्हाडांनी 96228 मतांच्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि राष्ट्रवादीचा गड कायम राखला. तर अजित पवार नजीब मुल्ला यांना दुसऱ्या क्रमांकाची 60913 मते मिळाली.


कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ


मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्याच्या नजीकचा असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये येतो, पण ठाणे लोकसभा मतदारसंघात येत नाही. या मतदारसंघात प्रामुख्याने कोळी आणि मुस्लिम बांधव आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड मानला जातो. 2009 पासून इथे जितेंद्र आव्हाड जिंकून येतात. कळवा भागात आगरी, कोळी आणि कोकणी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. तर, मुंब्रा आणि कौसा भागात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. 2009 सालापासून हा मतदारसंघ जितेंद्र आव्हाडांनी काबीज केलेला आहे. 


मतदारसंघाचा इतिहास


कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये बनवण्यात आला. याआधी तो बेलापूर मतदारसंघाचा भाग होता. बेलापूर एकेकाळी मोठा मतदारसंघ होता. पण, 2009 मध्ये त्याची पुर्नरचना करण्यात आली आणि कळवा-मु्ंब्रा मतदारसंघ बनला. कळवा-मुंब्रा मतदारसंघात आगरी-कोळी आणि मुस्लिम बांधव हे दोन मोठे मतदारवर्ग आहेत. त्यामुळे या दोन समाजाचा पाठिंबा असणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने निकाल लागतो. 2009 पासून हा निकाल जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने लागत आहे.


मुंब्रा-कळवा मतदारसंघ कसा आहे?


कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड आहे. 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांना मतदारराजाने कौल दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मतदारसंघात खूप कामही केलं आहे. कळव्यात नव्या सुविधा आणि उपक्रमही त्यांनी राबवले आहे. याच कारणामुळे 2014 च्या मोदी लाटेतही जनतेने जितेंद्र आव्हाडांनाच जिंकून दिलं. यंदाच्या निवडणुकीतही जनतेनं जितेंद्र आव्हाडांवर विश्वास दाखवत त्यांना विजय मिळवून दिला.


मतदारसंघातील समस्या


कळवा-मुंब्रा मतदारसंघात वाहतूक कोंडी हा मोठा विषय आहे. हा विषय अलिकडच्या काळात वेगवेगळ्या ओव्हरब्रीजमुळे कामी लागला आहे. कळवा खाडीच्या बाजूने नवीन पूल उभारल्याने वाहतूक कोंडींची समस्या कमी झाली आहे. त्याशिवाय कळवा-खारेगाव रेल्वे फाटक बंद करत तिथे ओव्हर ब्रीज बांधण्यात आल्याने रेल्वे फाटकात होणारे अपघात थांबले आहेत. पण, इथे अनधिकृत बांधकामाची मोठी समस्या असून यासोबत गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे.


कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल


जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - 157141 मते (विजयी)


नजीब मुल्ला (राष्ट्रवादी काँग्रेस) - 60913 मते


2019 चा निकाल



  • जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस) 109283 मते (विजयी)

  • दीपाली सय्यद (शिवसेना) - 75639 मते


2014 चा निकाल



  • जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस) - 86533 मते (विजयी)

  • दशरथ पाटील (शिवसेना) - 47683 मते 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kopri-Pachpakhadi Assembly Election 2024 : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ : एकनाथ शिंदे बाजी मारणार की मतदार भाकरी फिरवणार?